संत तुकाराममहाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कीर्तन महोत्सवासह विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:03 PM2018-01-13T14:03:39+5:302018-01-13T14:07:17+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने १६ ते २९ जानेवारीदरम्यान गोपाळपुरा वैकुंठ मंदिर व मुख्यमंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने १६ ते २९ जानेवारीदरम्यान गोपाळपुरा वैकुंठ मंदिर व मुख्यमंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मदिन दरवर्षीप्रमाणे उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली.
या प्रसंगी संस्थानचे विश्वस्थ अशोक निवृत्ती मोरे, उमेश मोरे आदी उपस्थित होते. श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त माघ शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) ते माघ शुद्ध दशमी (अनुग्रह दिन) या कालावधीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेसह कीर्तन महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यातील विविध कीर्तनकारांची कीर्तने ऐकायला मिळणार आहेत.
श्री संत तुकाराममहाराज चरित्र निरूपण माऊलीमहाराज सावर्डेकर करणार आहेत. व्यासपीठ बाळासाहेबमहाराज भोंदोंकर सांभाळणार आहेत. या कालावधीत पहाटे ४ ते ६ काकडा, पहाटे ५ ते ६ महापूजा, ७ ते १२ गाथा पारायण, दुपारी १२ ते २ संगीत भजन, दुपारी २ ते ४ गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ श्री संत तुकाराममहाराज चरित्र निरूपण, सायंकाळी
६ ते ७ हरिपाठ, रात्री ८ ते १० कीर्तन व रात्री १० नंतर जागर होणार आहे.
याच कालावधीत जिजामाता महिला भजनी मंडळ, देहू, गोरक्षनाथ भजनी मंडळ, देहू, भैरवनाथ भजनी मंडळ, चºहोली, फिरंगजाई भजनी मंडळ दापोडी, स्वामी समर्थ भजनी मंडळ, निगडी, श्री कृष्ण भजनी मंडळ, माळीवाडी यांची भजन सेवा होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मोरे यांनी दिली.
कीर्तन महोत्सवात रोज रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन होणार आहेत. सोमवार दि. २२ जानेवारी रोजी रामरावमहाराज ढोक, मंगळवार दि. २३ रोजी महादेवमहाराज बोराडे शास्त्री, बुधवार दि. २४ रोजी दादामहाराज शिरवळकर, गुरुवार दि. २५ रोजी महादेवमहाराज राऊत, शुक्रवार दि. २६ रोजी शंकरमहाराज शेवाळे, शनिवार दि. २७ रोजी उद्धव मंडलिकमहाराज, रविवार दि. २८ रोजी अनिलमहाराज पाटील बार्शीकर तर सोमवार दि. २९ रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीत देहूकरमहाराजांचे काल्याचे कीर्तन होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मोरे यांनी दिली.