वाकडमध्ये आठ टन चोरीची तूरडाळ पकडली, हिंजवडी पोलिसांनी केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:58 PM2017-08-28T16:58:39+5:302017-08-28T17:01:40+5:30
उस्मानाबादमधील परांडा ढोकी येथून जवळपास 163 गोणी डाळीने भरलेला ट्रक चोरट्यांनी लंपास केला होता. दरम्यान, हा ट्रक मुंबईला जात असताना हिंजवडी पोलिसांनी रविवारी (दि. 26) मध्यरात्री सापळा रचून मुंबई-बंगळुरु महामार्गावर वाकड येथून वाहनचालकासह क्लिनरला ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड दि. 28 - उस्मानाबादमधील परांडा ढोकी येथून जवळपास 163 गोणी डाळीने भरलेला ट्रक चोरट्यांनी लंपास केला होता. दरम्यान, हा ट्रक मुंबईला जात असताना हिंजवडी पोलिसांनी रविवारी (दि. 26) मध्यरात्री सापळा रचून मुंबई-बंगळुरु महामार्गावर वाकड येथून वाहनचालकासह क्लिनरला ताब्यात घेतले आहे. या ट्रकमध्ये सुमारे आठ टन इतकी डाळ असल्याचे समोर आहे.
असद दहेलु, वसीम शेख असे ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनचालक, क्लिनरचे नाव आहे. याबाबत हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, परांडा ढोकी येथून डाळीने भरलेला ट्रक लुटला होता. या घटनेबाबात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तेथील, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर काही दिवसांनी रिकामा ट्रक सापडला. मात्र, या ट्रकमधील डाळ गायब झालेली होती. त्यानंतर ही डाळ दुस-या ट्रकमधून मुंबईतील पटेल नावाच्या एका व्यापा-याकडे पुण्यातील वाकडमार्गे जाणार असल्याची माहिती हिंजवडी तपास पथकातील कर्मचारी आशिष बोटके पोलिसांना मिळाली. त्यानुसार, हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला. यानंतर या गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच वाहनचालक आली क्लिनरला हिंजवडी पोलिसांनी ढोकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.