मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर उलटल्याने वाहतुक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:36 PM2018-09-24T17:36:46+5:302018-09-24T17:39:45+5:30
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर खंडाळा एक्झिट समोरील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटत रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्या होत्या.
लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा बाह्य वळणाजवळील उतारावर भरधाव वेगातील कंटेनर उलटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. सोमवारी (दि.२४)साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईकडे जाणारी सर्व वाहने ही लोणावळा एक्झिटजवळून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने लोणावळा व खंडाळा शहरात देखिल वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर (एमएच-४६. एफवाय. ५३३०) हा खंडाळा एक्झिट समोरील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटत रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्या होत्या. सदर घटना घडली त्याठिकाणी बंदोबस्त करता पोलीस असल्याने तातडीने क्रेनला पाचारण करत कंटेनर बाजुला काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान एक्सप्रेस वेवरील सर्व वाहतुक ही वलवण येथील लोणावळा एक्झिट येथून जुन्या महामार्गावर वळविण्यात आली असल्याची माहिती महामार्गाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी दिली.