जीव मुठीत धरूनच होतोय प्रवास, येळसे-शिवली पूल खचला दुतर्फा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:48 AM2018-01-05T02:48:00+5:302018-01-05T02:48:12+5:30
पवनमावळ परिसरातील शिवली, ब्राह्मणोली, कडधे आदी पुलांची अवस्था बिकट झाली आहे. येळसे ते शिवली पूल दोन्ही बाजूंनी खचला असून, काही दिवसांपूर्वी एका बाजूने खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहनास बंदी घालण्याचे फलक लावले होते.
पवनानगर - पवनमावळ परिसरातील शिवली, ब्राह्मणोली, कडधे आदी पुलांची अवस्था बिकट झाली आहे. येळसे ते शिवली पूल दोन्ही बाजूंनी खचला असून, काही दिवसांपूर्वी एका बाजूने खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहनास बंदी घालण्याचे फलक लावले होते. परंतु पुलाचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही. या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.
येळसे गावातील बहुतेक विद्यार्थी शिवली येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यांना या पुलावरून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. शिवली, भडवली,काटेवाडी, येलघोल, धनगव्हाण, येवलेवाडी आदी गावांसाठी हा मुख्य रस्ता असून, परिसरातील नागरिकांना मुख्य बाजारपेठ व दळणवळणाची सुविधा पवनानगर (काले कॉलनी) आहे. पुलाच्या दोन्ही बाजू ढासळल्याने नागरिक, चाकरमानी, दूध व्यावसायिक व विद्यार्थी यांना जोखीम पत्करुनच ये-जा करावी लागते. अतिशय धोकादायक झाल्याने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. ब्राह्मणोली पूल हा जुना असून डागडुजी केलेली नाही. पुलाच्या खालील बाजूचे स्टिल पखराब झाले आहे. पुलावरून पवनानगर ते पौड व आजूबाजूच्या अनेक गावांना जाता येते.
पर्यटकांचे हाल
पवन मावळातील बहुतांश रस्ते दुरवस्थेत आहेत. पुलांचीही तशीच ्रपरिस्थिती आहे. या भागात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. खराब पूल आणि रस्त्यांचा स्थानिकांबरोबर पर्यटकांनाही बसतो. या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी या साठी शासनाने कोणत्याही चांगल्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. किमान रस्ते, पूल आणि इतर मूलभूत सुविधा जरी व्यवस्थित दिल्या तरी पर्यटकांना त्रास होणार नाही. पर्यटक संख्या वाढल्याने स्थानिकांच्या व्यवसायास हातभार लागेल. शासनाच्या महसुलातही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाढ होईल.