बावीस कोटी खर्चूनही कोंडी, डांगे चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे श्वास कोंढलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:01 AM2017-09-12T03:01:55+5:302017-09-12T03:02:00+5:30
डांगे चौकात नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सुमारे रुपये २२ कोटी खर्च करून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर दुहेरी (स्क्लिट) पूल उभारण्यात आला. पाच वर्षांपूर्वी उभारण्यात या पुलामुळे या चौकातील वाहतूककोंडी सुटली का, हा संशोधनाचा विषय आहे.
रहाटणी : डांगे चौकात नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सुमारे रुपये २२ कोटी खर्च करून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर दुहेरी (स्क्लिट) पूल उभारण्यात आला. पाच वर्षांपूर्वी उभारण्यात या पुलामुळे या चौकातील वाहतूककोंडी सुटली का, हा संशोधनाचा विषय आहे. चौकात वाढलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे डांगे चौकाचा श्वास गुदमरत असून, वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट होत आहे.
या चौकातून पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाºया-येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उड्डाणपुलाचा फायदा वाहतुकीस झाला नसल्याने या चौकातील वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. या चौकात रस्त्याच्या दुतर्फा बसणाºया हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांनी रस्ता गिळंकृत केल्याने या अडचणीत आणखीच भर पडली आहे. या समस्यकडे पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस डोळेझाक करीत असल्याचा आरोप वाहनचालक करीत आहेत. या चौकात मजूरअड्डा असल्याने अगदी सकाळी चौकात मोठ्या प्रमाणात मजूर उभे असतात. त्यामुळे चहावाले, नाश्तावाले, फळविक्रेते यांच्या इतर व्यवसायाच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर लागत असल्याने पादचाºयांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. डांगे चौकाकडून हिंजवडीकडे जाणाºया रस्त्यावर सहा सीटर रिक्षा, तीन सीटर रिक्षा व हातगाडीवाले, फेरीवाले यांनी सर्वच रस्ता काबीज केल्याने तीन पदरी असूनही वाहनचालकांना रस्ता शोधावा लागत आहे. हीच बाब हिंजवडीकडून डांगे चौकाकडे येणाºया रस्त्याची झाली आहे. वाहनचालकांना रस्ताच मोकळा मिळत नसल्याने चौकात वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
दुकानदारांचा डबल धंदा
रोजच होणाºया वाहतूककोंडीला अंकुश लागावा, म्हणून शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले. यासाठी अनेक मिळकतधारकांनी जमिनी दिल्या. त्यामुळे रस्ते मोठे झाले मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला नाही. दुकानाच्या समोर जागा हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांच्याकडून ठरावीक रक्कम घेऊन भाड्याने दिली आहे. त्यामुळे दुकानासमोरील फुटपाथ व रस्ता शिल्लकच राहिला नाही, तसेच तीन लेनमधील एक लेन हेच व्यावसायिक वापरात आहेत, तर दुसरी लेन सहा व तीन आसनी रिक्षावाल्यांनी काबीज केल्याने चालकांना रस्ताच शिल्लक राहत नाही. त्यामुळे या चौकाच्या चारही दिशांना अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
पुलाचा फायदा कोणाला?
सुमारे पाच वर्षांपूर्वी २२ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा फायदा नक्की कोणाला, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. या पुलाची लांबी ८५०० मीटर, तर रुंदी आठ मीटर असून, यासाठी २८ कॉलम उभारण्यात आले आहेत. मात्र पुलाचा खरेच वाहतूककोंडी सोडविण्यासाठी फायदा झालाय काय हा खरा प्रश्न आहे. कारण या पुलावरून तुरळक प्रमाणात वाहने ये-जा करताना दिसून येतात. मात्र, मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड ते हिंजवडी ते पिंपरी-चिंचवड या मार्गावर दिवसभर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. त्यामुळे हा पूल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.