दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 04:58 PM2019-03-17T16:58:32+5:302019-03-17T17:00:18+5:30
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
पिंपरी : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील भोसरीतील धावडेवस्ती येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.
सचिन शिवकरण काळगे (वय २१, रा. अश्विनी सुपर मार्केटजवळ, बापुजीबुवा नगर, थेराव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धावडेवस्ती येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर असून त्यामध्ये एटीएमच्या दोन मशीन आहेत. शुक्रवारी रात्री अकरा ते सव्वा अकरा यावेळेत अज्ञात चोरट्याने दोन्ही एटीएम मशीनचा कॅश व्हॉल्ट हा भाग गॅस कटरने कापला. त्यानंतर एका मशीनमधील २० लाख १८ हजार ४०० रुपये तर दुसऱ्या मशीनमधील १५ लाख ७ हजार ७०० रुपये असे एकूण ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केली. यामध्ये १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. यामध्ये दोन्ही एटीएम मशीनचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.