वर्गणी दिली नाही म्हणून पिंपरीत दाेघांना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 06:01 PM2018-09-09T18:01:55+5:302018-09-09T18:03:29+5:30
गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली.
पिंपरी : गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडवण्यास गेलेल्या एका वडापाव विक्रेत्यालाही जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास रामनगर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन गायकवाड, किरण विटकर, मयूर संजय विटेकर (वय १९, रा. शेलार चाळ, रामनगर, चिंचवड) अशी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अाहे. वैभव माने (वय २२), रमजान शेख (वय १९, दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर याची रामनगर येथे राम मंदिरासमोर वडापावची हातगाडी आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी वैभव, रमजान आणि त्यांचा आणखी एक साथीदार वडापावच्या गाडीजवळ गणेश उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी मयूर याचा मित्र किसन गायकवाड आणि किरण विटकर हे दोघे गाडीजवळ थांबले होते. आरोपींनी किसन याच्याकडे गणपती उत्सवाची वर्गणी मागितली. त्यावरून आरोपी आणि किसन यांच्यामध्ये वाद सुरु झाले. वैभव याने गाडीवरील झारा उचलून किसनला मारहाण केली. रमजान आणि अन्य एका आरोपीने किरण याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मयूर गेला असता वैभव याने बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू मयूरच्या डोक्यात मारला. या मध्ये मयूर गंभीर जखमी झाला. आरोपी अद्याप फरार आहेत. पिंपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख अधिक तपास करत आहेत.