शेतकरी संपामुळे भाजीपाला कडाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:08 AM2018-06-11T02:08:04+5:302018-06-11T02:08:04+5:30
भाजीपाला ही दैनंदिन गरज आहे. त्यामुळे आज कोणती भाजी खरेदी करावी, असा प्रश्न महिलांना दररोज सतावत असतो. परंतु आता भाजीची ‘चॉईस’ राहिली नाही. कारण राज्यात शेतकरीराजाने संप पुकारल्याने बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे.
रहाटणी - भाजीपाला ही दैनंदिन गरज आहे. त्यामुळे आज कोणती भाजी खरेदी करावी, असा प्रश्न महिलांना दररोज सतावत असतो. परंतु आता भाजीची ‘चॉईस’ राहिली नाही. कारण राज्यात शेतकरीराजाने संप पुकारल्याने बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाजी खावी तर कोणती, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना सतावत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे पिंपरी येथील भाजी बाजारात फार कमी व मोजक्याच भाज्यांची आवक झाली़ त्यामुळे ग्राहकांना कोणतीच पसंती राहिली नाही़ सध्या ग्राहक मिळेल ती भाजी खरेदी करीत आहेत; मात्र तीही ‘मुहमांगे’ किमतीला त्यामुळे ग्राहक मोठ्या संकटात सापडला आहे. याचाच फायदा छोटे व्यावसायिक घेत आहेत. भाजी मंडईतील किमतीच्या तीन पटीने भाजी ग्राहकांना विकली जात आहे. भाजी ठेलेवाले, हातगाडीवाले संपाचे भांडवल करून ग्राहकांना लुटण्याचा धंदा सुरूकेला आहे.
नाश्त्याला काय करायचे, जेवणात कोणती भाजी करायची आणि रात्रीच्या मेन्यूत कशाचा समावेश करायचा, अशी विवंचना महिलांना असते़ मात्र सकाळीच दारावर आलेला भाजीविक्रेता जेव्हा भाज्यांचे दर सांगतो त्या वेळी मात्र कोणती भाजी घ्यावी, असा प्रश्न महिलांना पडत आहे. या प्रश्नाचे उत्तर सध्या पतिराजाकडेही नाही. हा संप असाच सुरू राहिला तर ग्राहकांचे मोठे हाल होणार आहेत.
शहरात काही शाळा सुरू झाल्या आहेत तर उर्वरित शाळा काही दिवसांनी सुरू होतील. भाज्यांचे दर स्थिर झाले नाहीत. दुधाचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागेल. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात दुधाचीही आवक कमी झाल्याने शहराच्या अनेक भागांत दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे, तर स्थानिक दुधवाल्याने अचानक दुधाचे दर वाढवून ग्राहकांची लूट सुरू केली आहे़ यावर सरकार कशा प्रकारे अंकुश ठेवणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
छोट्या मंडईत शुकशुकाट
रहाटणी फाटा येथील मंडईत कोणत्याच प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध न झाल्याने अनेक विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. काही विक्रेत्यांनी आहे तोच माल चढ्या दराने विकला. काही विक्रेत्यांनी उपनगरांतील शेतमाल आणून विकला़ मात्र त्यासाठी तीन ते चार पटीने किंमत आकारण्यात आल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या गावांत आणि उपनगरांत अद्यापही भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी हा भाजीपाला शेतातून खरेदी करून शहरात विक्री करीत आहेत. यात शेतकऱ्यासही जादा दर मिळत आहे. व्यापाºयालाही जादा नफा मिळत आहे. मात्र त्याबाबत कोणीही विचार करीत नसल्याची खंत ग्राहकांनी व्यक्त केली.
आठवडे बाजारही ओस
पिंपळे सौदागर, रहाटणीसह परिसरात आणि शहरात आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले होते. राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे आठवडे बाजार सुरू केले आहेत. शेतकरी
संपामुळे या आठवडे बाजारांतही भाजीपाल्याची आवक झाली नाही. शेतकºयांनीही या बाजारांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे बाजार ओस पडले आहेत.
सध्याची रोजच सुरू असलेली पेट्रोल दरवाढीमुळे गृहोपयोगी वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जगणे कठीण झाले आहे. त्यात शेतकºयांनी संप सुरू केल्याने आणखी माहागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महिन्याचे ‘बजेट’ आवाक्या बाहेर गेले आहे. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा होती; मात्र आम्हा सर्वसामान्य नागरिकांची पूर्ण निराशा झाली आहे. त्यामुळे आम्हाला कुणीच वाली नाही.
- उषा कांबळे, गृहिणी
सध्या शेतकºयांचा संप सुरू असल्याने भाज्यांची आवक म्हणावी तेवढी होत नाही. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ज्या ठिकाणी भाजी मिळते ती आणून ग्राहकांना काही फार चढ्या दराने विक्री करावी लागत आहे. मात्र संपाचा फटका विक्रेत्यांसह ग्राहकांना ही बसत आहे.
- जगदीश नगरकर,
भाजी विक्रेते