महापालिका व्हेंटिलेटरवर, सहा महिने उलटूनही नाही गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 06:47 AM2017-10-07T06:47:19+5:302017-10-07T06:47:26+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तांतरानंतर पाणी, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करू लागले आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तांतरानंतर पाणी, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेसह विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने महापालिकेचा कारभार व्हेंटिलेटरवर असल्याची टीका केली आहे.
महापालिकेतील सत्तातराला सहा महिने पूर्ण झाली. तरीही महापालिकेचा कारभार पारदर्शक व गतीमान झालेला नाही. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील व पालकमंत्री गिरीश बापट यांनीही महापालिकेच्या पदाधिका-यांवर बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच, कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्टÑवादीच्या नगरसेवकांची महापालिकेत बैठक घेऊन चुकीच्या कारभारावर ताशेरे ओढले. आता राष्ट्रवादीकडून शहरात जन हाहाकार आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीबरोबर आता शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही महापालिकेच्या कारभाराचे आॅपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महापालिकेचा कारभार व्हेंटिलेटरवर आहे, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. तर
शास्ती करात माफी, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित केला आहे. तर योग्य वेळ आल्यानंतर प्रहार करू, असा इशारा विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दिला आहे.
सत्ताधाºयांची हतबलता
भाजपाच्या हाती एकहाती सत्ता देऊनही मूलभूत प्रश्न सुटण्याऐवजी आणखी तीव्र होऊ लागले आहेत. कचरा, पिण्याचे पाणी, वाढते साथीचे आजार, जलनिस्सारण आदी प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे. निविदाप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. मैला शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. सत्ताधाºयांचा प्रशासनावर वचक न राहिल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
गत आठवड्यामध्ये आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी संयुक्त बैठक घेतली होती. त्यानंतर महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यात संथगतीने सुरू असणाºया कामांचा आढाव घेण्यात आला होता. आदेश देऊनही अधिकारी ऐकत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. सत्ताधाºयांनीही अधिकारी ऐकत नाही, अशी हतबलता व्यक्त केली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जुंपली आहे.
मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयश
१पिंपरी : महापालिका प्रशासनाने शहरातील आरोग्य, पाणी, घनकचºयाबाबत होणाºया प्रश्नांविषयी कबुली दिली असली, तरी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम कोणी करीत असेल, तर ते चुकीचे आहे. विविध प्रश्नांवर तोडगा निघत नसल्याने महापालिका यंत्रणा मूलभूत समस्या सोडविण्यात अपयशी ठरत आहे. महापालिका व्हेंटिलेटरवर आहे, अशी टीका खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
२ महापालिकेतील विविध रखडलेल्या प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका
भवनात आयुक्तांबरोबर बैठक घेतली.
या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडी प्रमुख सुलभा उबाळे, नगरसेवक नीलेश बारणे, अश्विनी चिंचवडे, अमित गावडे आदी उपस्थित होते.
३ खासदार बारणे म्हणाले, ‘‘मूलभूत सुविधा पुरविणे हे महापालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र, कचºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम ठप्प झाले आहे. केवळ कोणी कोर्टात गेले आहे, असे उत्तर देऊन भागणार नाही. पर्यायी उपाययोजना करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. रस्त्यांवर, चौकाचौकांत अतिक्रमण वाढत आहे. बाहेरच्या राज्यातून आलेल्या पथारीवाल्यांचा त्रास नागरिकांना होत आहे.
४पिण्याचे पाणी कोणत्याही परिसरात पूर्ण दाबाने येत नाही. पवना धरण पूर्ण भरले असतानाही टंचाई कशी? साथीच्या आजारांचा विळखा पडला आहे. आरोग्य विभाग अकार्यक्षम असल्याचे दिसून येते. नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. याकडेही दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या शाळांमध्येही स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. ’’
राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप केले. गोबल्स नीतीचा अवलंब केला. साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करून भाजपाने सत्ता मिळविली आहे. सहा महिने झाले. परंतु, राष्ट्रवादीवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करू शकले नाहीत. आता योग्य वेळ आली की, त्यांच्यावर प्रहार आहे, असे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले.