कचऱ्यापासून वीजनिर्मिती, आयुक्त श्रावण हर्डीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:30 AM2017-08-07T03:30:22+5:302017-08-07T03:30:22+5:30
पिंपरी : कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये ६० एजन्सींनी सहभाग घेतला. हॉटेलचा दररोज ५० टन कचरा निर्माण होते. यापासून सीएनजी तयार करण्याचे नियोजन आहे. घरोघरी निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी एखादी संस्था आली, तर त्याचाही महापालिका सकारात्मक विचार करेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महापालिकेचे आयुक्त हर्डीकर यांनी विविध प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला. त्यात उपसूचनांचा विषय, कचºयापासून वीजनिर्मिती, पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटी अशा विविध प्रकल्पांबद्दल ‘सद्य:स्थिती काय’ या विषयी माहिती दिली.
विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी ४४६ निविदा त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी केली होती. त्यावर आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘पालिकेच्या अर्थसंकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. महासभेत झालेले ठराव बेकायदा नाहीत. कायदेशीर ठरावाचीच प्रशासन अंमलबजावणी करणार आहे. तसेच सभेत आलेल्या उपसूचना नगरसचिवांना तपासण्याची सूचना केली आहे.’’
स्मार्टला लवकरच निधी
स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून लवकरच निधी मिळेल. स्मार्ट सिटीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस अधिकारी अथवा तज्ज्ञ व्यक्तीचा शोध सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कामकाज करण्यासाठी काही पदे भरणे गरजेचे आहे. ते भरण्यात येणार आहेत, तर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची पुढच्या आठवड्यात पहिली बैठक होईल, असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
पाण्याच्या पुनर्वापरासाठी पॉलिसी तयार करू
हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचीही गरज वाढणार आहे. प्रामुख्याने पाणीगळती रोखणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पॉलिसी तयार करण्याचे विचाराधीन आहे. अमृत योजनेतील ४० टक्के शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळा संपल्यानंतर वेगात सुरू होईल.’’