अधिका-यांच्या पदोन्नतीची चिंता, सत्ताधारी भाजपाने तहकूब केली सभा; वैद्यकीय अधिका-याच्या निवडीत रस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:04 AM2017-09-21T01:04:41+5:302017-09-21T01:04:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा सर्वसाधारण सभा तहकूब केली. विषय पत्रिकेवर आरक्षणे ताब्यात घेणे, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियानाविषयीचे महत्त्वाचे विषय असताना चर्चा न करताच केवळ वैद्यकीय अधिका-यांच्या अधिकारी नियुक्तीस उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश आल्याने सत्ताधा-यांनी सभा तहकूब केली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा सर्वसाधारण सभा तहकूब केली. विषय पत्रिकेवर आरक्षणे ताब्यात घेणे, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियानाविषयीचे महत्त्वाचे विषय असताना चर्चा न करताच केवळ वैद्यकीय अधिका-यांच्या अधिकारी नियुक्तीस उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश आल्याने सत्ताधा-यांनी सभा तहकूब केली. शहराचे प्रश्नांऐवजी सत्ताधा-यांना अधिका-यांच्या पदोन्नतीत रस असल्याची टीका होत आहे.
गेली सहा महिने सलगपणे सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविले. मात्र, सप्टेंबर महिन्याची सभा कोणतेही सबळ कारण नसताना महिनाभर तहकूब केली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. कार्यक्रमपत्रिकेवर सहा विषय होते. त्यात आरोग्य-वैद्यकीय अधिकारीपदावर डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती करणे, दिघीतील आरक्षित जागांचे संपादन करणे आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक घरगुती स्वच्छतागृह बांधण्याच्या कामाची माहिती देणे या तीनच प्रस्तावांचा समावेश होता. तर, महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा समित्यांचे सभावृत्तांत कायम करणे या सभाशाखेच्या तीन प्रस्तावांचा अंतर्भाव होता. दुपारी दोनला सभेला सुरुवात झाली. विलास मडिगेरी यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार, महापौरांनी सभा महिनाभर पुढे ढकलल्याचे जाहीर केले.
>महापालिकेच्या सभागृहात पैजा
डॉ. साळवेची निवड करायची की रॉय यांना कायम ठेवायचे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आज पैजा लागल्या होत्या. सत्ताधारी हा विषय रेटून नेण्यासाठी तयारीनिशी उतरले होते. तर विरोधक त्यास विरोध करण्याच्या तयारीत होते. हा विषय आजच्या सभेत मंजूर होणार किंवा नाही याविषयीही पैजा लागलेल्या होत्या. मात्र, याविषयावर चर्चा झालीच नाही.
सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर महत्त्वाचे विषय नसल्याने या महिन्याची सभा तहकूब केली आहे.
- नितीन काळजे, महापौर