भाजपामध्ये इनकमिंग जोरात! प्रवीण छेडांची घरवापसी; भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:37 PM2019-03-22T14:37:16+5:302019-03-22T14:38:21+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश
मुंबई: काँग्रेस नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. छेडा यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीही कमळ हाती घेतलं. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. यावेळी भाजपाचे खासदार संजय काकडे उपस्थित होते. काकडे यांची नाराजी दूर झाल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
प्रवीण छेडा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपानं काल संध्याकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र यामध्ये ईशान्य मुंबईचा समावेश नाही. भाजपाचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. मात्र त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे भाजपानं अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मतदारसंघातून सोमय्यांऐवजी छेडा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. आधी भाजपामध्ये असलेल्या छेडा यांनी प्रकाश मेहतांसोबत मतभेद झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रवीण छेडांसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला. पवार यांनी 2014 मध्ये दिंडोरीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपाच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादीनं त्यांना तिकीट नाकारत धनराज महालेंना संधी दिली. दोनच दिवसांपूर्वी माढ्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याआधी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला.