Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात विविध पक्षांतील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:04 AM2019-03-11T06:04:26+5:302019-03-11T06:05:18+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गेल्या वेळी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागलेल्या काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळवून देण्याचे आव्हान खा. अशोक चव्हाण यांच्यासमोर असेल.
राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी महाराष्ट्रात चांगले यश मिळवण्याचे आव्हान हे पवार यांच्यासमोर राहील. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी घेऊन मुख्यमंत्री फडणवीस मतदारांसमोर जातील. स्वबळावर लढण्याचा निर्णय मागे घेत भाजपाशी युती केलेले उद्धव ठाकरे यांचा युतीचा निर्णय योग्य होता की अयोग्य याचा फैसलादेखील या निमित्ताने होणार आहे.
गेल्या वेळी सर्व ४८ जागा लढवणाऱ्या बहुजन समाज पार्टीला यावेळी कितपत मते मिळतील? राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसे काय भूमिका घेणार? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कुठली भूमिका घेतात हेही महत्त्वाचे असेल. भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांच्या वंचित आघाडीची यावेळी मोठी चर्चा आहे. ही आघाडी कितपत यश मिळवेल, आघाडीचा कोणाला फायदा होईल याचा फैसलादेखील होणार आहे