किरीट सोमय्यांविरोधात निवडणूक लढणार; शिवसेना आमदारानं दंड थोपटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:53 PM2019-03-28T12:53:32+5:302019-03-28T12:58:07+5:30
किरीट सोमय्यांच्या अडचणींमध्ये वाढ
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस कमी होत असताना ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. किरीट सोमय्यांना तिकीट देण्यात आल्यास त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. 'वेळ पडल्यास मी अपक्ष लढेन. पण मी सोमय्यांविरोधात 100 टक्के निवडणूक लढवणार,' असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांची डोकेदुखी वाढली आहे.
Shiv Sena MLA Sunil Raut,brother of Shiv Sena MP Sanjay Raut,has said he'll contest Lok Sabha elections from Mumbai North east constituency even if Kirit Somaiya is given a ticket by BJP from here;says, "I'll go independent if needed but will contest against Somaiya.I'm 100% sure
— ANI (@ANI) March 28, 2019
शिवसैनिकांचा रोष असल्यानं अद्याप भाजपाकडून किरीट सोमय्या यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. महापालिका निवडणुकीवेळी थेट शिवसेना नेतृत्त्वावर तुटून पडलेले भाजपा खासदार किरीट सोमय्या सध्या मातोश्री भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना-भाजपा युती झाली असली, तरी शिवसैनिकांचा सोमय्या यांच्यावरील राग कायम आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करण्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळेच आता सोमय्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ मिळालेली नाही.