...जेव्हा शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयासाठी शुभेच्छा देतात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 10:56 PM2019-04-08T22:56:00+5:302019-04-08T23:05:41+5:30

शिवसेना आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

lok sabha election shiv sena mla sunil raut gives best wishes to ncp candidate sanjay dina patil | ...जेव्हा शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयासाठी शुभेच्छा देतात

...जेव्हा शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयासाठी शुभेच्छा देतात

मुंबई: शिवसेना-भाजपामध्ये युती झाली असली, तरी कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मनोमीलन झालंय का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना ईशान्य मुंबई मतदारसंघात घडली. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी एका भूमीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ईशान्य मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विद्यमान भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवाराला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर भाजपानं किरीट सोमय्यांचं तिकीट कापून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. मात्र तरीही स्थानिक पातळीवर धुसफूस कायम आहे.



नेतृत्त्वानं तिकीट कापल्यानंतरही किरीट सोमय्यांनी कोटक यांचा जोमानं प्रचार करण्यास सुरुवात केली. मात्र सोमय्या प्रचारातही नको, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यातच आता  शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी थेट राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. 'संजय पाटील यांना शुभेच्छा. त्यांचा विजय होवो. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा', असं राऊत म्हणाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

शिवसेनेचे आमदार आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू असलेले सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात दंड थोपटले होते. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष म्हणून त्यांना आव्हान देऊ, असं राऊत यांनी म्हटलं होतं. याशिवाय स्थानिक शिवसैनिकांनीदेखील सोमय्यांविरोधात भूमिका घेतली होती. सोमय्यांना तिकीट दिल्यास प्रचार करणार नाही, असा संदेश शिवसैनिकांनी मातोश्रीवर कळवला होता. त्यानंतर सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना मातोश्रीकडून भेटीसाठी वेळ देण्यात आली नाही. अखेर भाजपा नेतृत्त्वानं सोमय्यांचं तिकीट कापत मनोज कोटक यांना रिंगणात उतरवलं. सध्या सोमय्यांकडून कोटक यांचा प्रचार सुरू केला. मात्र याला शिवसैनिकांचा विरोध आहे. 

Web Title: lok sabha election shiv sena mla sunil raut gives best wishes to ncp candidate sanjay dina patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.