कोपरी पाचपाखाडीमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी साधला विजयाचा चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:08 PM2019-10-24T22:08:25+5:302019-10-24T22:17:05+5:30

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णायक आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत ठेवत ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला.

Shiv Sena's Eknath Shinde scored a victory in Kopri Panchpakhari | कोपरी पाचपाखाडीमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी साधला विजयाचा चौकार

८९ हजार ३०० चे मताधिक्य

Next
ठळक मुद्दे८९ हजार ३०० चे मताधिक्यपहिल्या फेरीपासूनच आघाडीमतदारांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला. त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा पराभव करून विजयाचा चौकार साधला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मतदारांनी दाखविलेले प्रेम आणि आशीर्वाद यामुळे हा विजय मिळवू शकल्याची प्रतिक्रिया विजयानंतर त्यांनी व्यक्त केली.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. पहिल्या फेरीत त्यांना चार हजार २३० मते मिळाली. त्यावेळी काँग्रेसच्या घाडीगावकर यांना ८९८, तर मनसेच्या महेश यांना ५५५ मते मिळाली. वंचित आघाडीचे उन्मेष बागवे हे चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना अवघी २३१ मते मिळाली. पुढे २७ व्या फेरीपर्यंत शिंदे यांनी आघाडी कायम राखली. एक लाख १३ हजार ४९७ अर्थात एकूण मतदानाच्या ६५.३६ टक्के मते मिळवून ते विजयी झाले. पराभूत घाडीगावकर यांना २४ हजार १९७ मते मिळाली. तर, मनसेच्या कदम यांना २१ हजार ५१३ मते मिळाली. २०१४ मध्ये शिवसेना व भाजप युती नसतानाही शिंदे यांना एक लाख १४८ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपच्या संदीप लेले यांचा त्यांनी पराभव केला होता. गेल्या विधानसभेच्या शिवसेना, भाजपच्या एक लाख ४८ हजार ५९५ मतांसह एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिंदे यांना होता. अपेक्षित मताधिक्य साधता न आल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. दरम्यान, २००९ मध्येही ३२ हजार ७७६ चे मताधिक्य शिंदे यांना होते. २०१४ च्या तुलनेत यावेळी १३ हजार ३४९ चे मताधिक्य त्यांना मिळाले आहे. यावेळी ८९ हजार ३०० चे मताधिक्य साधून चौथ्यांदा यशस्वी ठरल्याने चौदाव्या फेरीलाच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचा सत्कार करून जल्लोष केला.
‘‘महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत, मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाच्या जोरावर ही निवडणूक जिंकलो. सर्व मतदार, कार्यकर्ते तसेच आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी देणाऱ्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे.’’
एकनाथ शिंदे, नवनिर्वाचित आमदार, कोपरी-पाचपाखाडी
..................
‘‘जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून ठाणे शहराला व ठाणेकरांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. ’’
संजय घाडीगावकर, पराभूत उमेदवार, काँग्रेस
.........................
नोटाचे प्रमाण २.९६ टक्के
या मतदारसंघात ४४३ पैकी ३४४ मतदारांनी शिंदे यांना टपाली मतदानातून कौल दिला. काँग्रेसच्या घाडीगावकर यांना २२ मते मिळाली. तब्बल पाच हजार १४७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले. हे प्रमाण एकूण मतदानाच्या २.९६ इतके टक्के आहे.

Web Title: Shiv Sena's Eknath Shinde scored a victory in Kopri Panchpakhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.