सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 12:07 PM2019-03-13T12:07:20+5:302019-03-13T12:07:44+5:30
सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी आणि राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी, असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे.
मुंबई- सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी आणि राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी, असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला दिली तर जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावी, असाही प्रस्ताव असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
रावेरची जागा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीकडे मागितली आहे. त्या बदल्यात सिंधुदुर्ग- रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सोडली जाऊ शकते. रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खडसे खासदार आहेत, तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा शिवसेनेचे विनायक राऊत यांच्याकडे आहे. निलेश राणे 2009 मध्ये या मतदारसंघातून विजयी झाले होते, पण 2014च्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य असलेले नारायण राणे यांचे निलेश हे पुत्र आहेत. निलेश यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर नारायण राणे काय भूमिका घेतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.