यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 07:51 AM2019-05-03T07:51:54+5:302019-05-03T07:56:29+5:30
एकाच दिवशी काँग्रेसकडून सर्जिकल स्ट्राइकचे दोन आकडे जाहीर
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुरक्षा दलांच्या कामगिरीचं, सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकसारख्या कारवायांचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं वारंवार केला आहे. निवडणूक प्रचारांच्या भाषणांमध्ये अनेकदा एअर स्ट्राइकचा उल्लेख करणाऱ्या मोदींवर काँग्रेसनं टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं. मात्र आपल्या काळात दहशतवाद्यांना घरात घुसून मारल्याचं मोदी सांगत आहेत. यानंतर आता काँग्रेसनंदेखील सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा लावून धरल्याचं म्हणत यूपीए सरकारच्या काळात अशा कारवाया झाल्याचा दावा केला. मात्र या कारवायांच्या आकड्यात तफावत असल्याचं समोर आलं आहे.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकवर जोर दिला आहे. यावरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींवर निशाणा साधला. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र आम्ही कधीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही, असं विधान सिंग यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत केलं. काल सकाळच्या सुमारास ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर दुपारी काँग्रेसनं एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पक्षाचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला.
राजीव शुक्ला यांनी पत्रकारांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे आणि कधी करण्यात आली, याची तपशीलवार माहिती दिली. पूंछमधील भट्टल सेक्टर (19 जून 2018), केलमधील शारदा सेक्टर (30 ऑगस्ट-1 सप्टेंबर 2011), सावन पात्रा चेकपोस्ट (6 जानेवारी 2013), नाझपीर सेक्टर (27-28 जुलै 2013), नीलम व्हॅली (6 ऑगस्ट 2013) आणि 23 डिसेंबर 2013 रोजी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आल्याचं शुक्ला म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही, अशा शब्दांत शुक्ला यांनी मोदींना टोला लगावला.
दुपारच्या सुमारास काँग्रेसकडून ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यानंतर संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत 'इंडिया टुडे'नं प्रसिद्ध केली. यात त्यांना मोदींच्या काळात झालेल्या दोन सर्जिकल स्ट्राइकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना राहुल यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात तीन सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं म्हटलं. 'आम्ही ही गोष्ट कधीच जाहीर केली नव्हती. कारण आम्हाला लष्कराच्या कामगिरीचं राजकारण करायचं नव्हतं. आम्हाला जवानांचा वापर करायचा नव्हता. ते (मोदी) जवानांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. आम्ही जवानांना सलाम करतो. त्यांचा आदर करतो. राजकीय लाभासाठी सैन्याचा वापर करुन आम्ही त्यांचा अपमान करत नाही,' असं राहुल गांधींनी म्हटलं.