गेले ‘ते’ दिवस राहिल्या ’त्या’आठवणी.. अशा सभा पुन्हा होणे नाही..!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:41 PM2019-03-26T13:41:13+5:302019-03-26T15:02:43+5:30
हल्ली त्या सभा फक्त एक आठवण होवून राहिल्या आहेत.ती गर्दी,तो उत्साह,, लगबग, सगळं वातावरण कसे भारलेले असत..
- दीपक कुलकर्णी -
पुणे: निवडणुका म्हटल्या की पक्ष आले .. आणि पक्ष आले की नेत्यांच्या सभा आल्या.. या सभांचा चौरंगी इतिहासात काही नेत्यांच्या सभांनी गर्दीचे उच्चांक गाठत अनेक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केले आहे.. आणि काही मातब्बर राजकीय नेते तर त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीच्या उच्चाकांमुळेच ओळखले जातात. त्यात पंडित जवाहरलाल नेहरु, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधी,असे ही झाली जुन्या पिढीतील काही नावे .. आणि अगदी अलिकडचे म्हणालात तर राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले, राहुल गांधी, कन्हैय्या कुमार असे काही लक्षणीय नावे..या नेत्यांच्या सभांना होणारी गर्दी ही त्या भाषणशैली, व्यक्तिप्रेम, पक्षप्रेम या अनुषंगाने येत असली तरी त्यांच्या सभांना होणारी तुफान गर्दी लक्षवेधी ठरणारी आहे. त्या सभांशी संबंधित काही आठवणी, रंगतदार किस्से आजदेखील बुजुर्गांच्या डोळ्यांसमोर ठळकपणे तरळताना दिसतात.
गाजलेल्या सभांचे क्षेत्र फक्त मुंबई , पुणे पुरते मर्यादित नव्हते.. देशाच्या कानाकोपरा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणाने , सभांमधील फटकेबाजीने नुसता धुमसत असायचा.. पण या धामधुमीत प्रत्येकाचा असा एक पॉलिटिकल आयकॉन ठरत.. ज्याच्या प्रेमापायी काहींनी आपले आयुष्य त्याच्या पक्षाला , विचारांना वाहिले आहे.. त्यातूनच आज माहीर काही राजकीय नेते घडलेले आहे.. कधी कुणा नेत्यातील आक्रमकता तर कुणाची विनम्रता, तसेच त्यांनी वेळोवेळी जपलेले सामाजिक बांधिलकीचे योगदान अशी विविध कारणे या होणाऱ्या गर्दीला पाठीमागे असतील. पण सगळ्याचा पाया होता ती म्हणजे पक्षनिष्ठा..जुन्या काळात पक्षनिष्ठा, व्यक्तिप्रेम, साधेपणा, या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व होते.. सभेच्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जमिनीवर मांडी घालून केलेले झुणका भाकरीचे साधे जेवण ही दीर्घकाळ आठवण मनावर कोरुन जात असत. त्यावेळी कुठे होते हो फाईव्ह स्टार हॉटेल्स, लॉज वगैरे.. अशाच प्रसंगातून मग कार्यकर्ते आपले कुटुंब, रोजी रोटी सोडून ‘साहेबां ’साठी तहान भूक विसरत पायाला भिंगरी लावून पळण्यापासून ते वाट्टेल ते करण्यापर्यंत एका हाकेवर तयार असत..
पण हल्ली अशी पक्षनिष्ठा असलेले नेतेच दुर्मिळ होत चालले आहे तर कार्यकर्त्यांची बात लाखो कोसो दूरच...अजूनसुध्दा मनापासून झटणारे कार्यकर्ते असतील..ही गर्दी अशा कार्यकर्त्यांची होती.. पण मला आठवतंय माझ्या लहानपणी राजकीय सभांना ऐकण्यासाठी काही किलोमीटर सायकलसह मिळेल त्या वाहनाने किंवा चालतही जात असत..
परंतु, हल्ली त्या सभा फक्त एक आठवण होवून राहिल्या आहेत. ती गर्दी,तो उत्साह,, लगबग, सगळं वातावरण कसे भारलेले असत.. या सभांमधील त्या भाषणांचा किंवा नेत्यांचा ज्वर पुढील काही दिवस उतरत नसत. सध्याच्या परिस्थितीत सभा होतात पण कधी नेत्यांच्या आगमनाला होणारा अतिउशीर, स्टार प्रचारकांच्या माथी असलेला भरगच्च कार्यक्रम..त्यानंतर सुरु झालेली चालणारी रटाळ आणि लांबलचक प्रस्तावना, मनोगते असे सारं सोपस्कर पार पडल्यावर काही तासाने होते नेत्यांचे भाषण. तेही पुढील दौऱ्यामुळे आटोपतेच.. त्यातील मुद्दे , टीका यांची गणती तर किरकोळीतच... सर्वच पक्ष आणि नेत्यांच्या बाबतीत कदाचित हे अनुमान बरोबर असेल असेही नाही. या प्रकारच्या बेरंग सभांचे अधिक असणार हे सत्य आहेच. त्या काळात होणाऱ्या टीका ही खिलाडूवृत्तीने घेतल्या जात.. किंवा एक राजकीय वयोमर्यादा यांचे भान बाळगले जात. नेहमी राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद किंवा व्यक्तिद्वेष भरलेला नसत...
बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची तर गंमतच न्यारी होती. ते कधीच लिहून भाषण करत नसत. उत्स्फूर्त आणि ताज्या घडामोडींवर जळजळीत भाष्य करणारे त्यांच्या भाषणाची दुसऱ्या दिवशी तुफान चर्चा झाल्याशिवाय राहत नव्हते. अनेक नेते असे होते की त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी लोक कानात प्राण ऐकून बसत.. हल्ली भाषणे अभ्यासपूर्ण असतात, काही नेत्यांच्या सभांना गर्दीही भरपूर होते. पण ही गर्दी ‘मॅनेज’असल्याची ‘सॉफ्ट’चर्चा कानावर पडते.. तेव्हा एकच वाक्य बाहेर येते ते म्हणजे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.. अशा सभा पुन्हा होणे नाही...