'ते' चांगले व्यंगचित्रकार झाले असते; महापौरांनी राज ठाकरेंवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 08:23 PM2018-11-09T20:23:24+5:302018-11-09T20:24:32+5:30
महापौर म्हणाले की,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांना व्यंगचित्राचा वारसा मिळाला आहे. त्यांनी इतर ठिकाणी लक्ष घालण्यापेक्षा व्यंगचित्रांकडेच लक्ष दिले असते तर ते चांगले व्यंगचित्रकार झाले असते आणि त्यांचे माझ्यावर काढलेले व्यंगचित्र अधिक चांगले झाले असते असा टोला त्यांनी लगावला.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान सोडून महापौर राणीच्या बागेतील पिंजऱ्यात जाणार अशी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग चित्रातून केली होती. लोकमत ऑनलाईनमध्ये राणीच्या बागेत महापौर पिंजऱ्यात या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सदर प्रतिनिधीशी संपर्क साधून आपली भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली. यावेळी महापौरांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
महापौर म्हणाले की,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांना व्यंगचित्राचा वारसा मिळाला आहे. त्यांनी इतर ठिकाणी लक्ष घालण्यापेक्षा व्यंगचित्रांकडेच लक्ष दिले असते तर ते चांगले व्यंगचित्रकार झाले असते आणि त्यांचे माझ्यावर काढलेले व्यंगचित्र अधिक चांगले झाले असते असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेनाप्रमुखांचा सच्चा शिवसैनिक असल्याचा मला रास्त अभिमान असून शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यापेक्षा शिवसेनाप्रमुखांचे स्मारक येथे होणे माझ्यासह तमाम शिवसैनिकांसाठी अभिमानाची आणि सर्वात मोठी गोष्ट आहे.आणि माझ्या कारकिर्दीत येथे स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार आहे ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.