"या" ठिकाणी शाेधण्यात आले 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:27 PM2019-05-07T20:27:44+5:302019-05-07T20:31:37+5:30
पुण्यातील डेक्कन काॅलेजमधील संस्कृत व काेशशास्त्र विभागामध्ये 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ शाेधण्यात आले आहेत.
राहुल गायकवाड
पुणे : पुण्यातील डेक्कन काॅलेजमधील संस्कृत व काेशशास्त्र विभागामध्ये 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ शाेधण्यात आले आहेत. हजाराे संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन तज्ञांनी संस्कृत शब्दांचे अर्थ व त्यांचे संदर्भ शाेधून काढले आहेत. या संस्कृत शब्दांचा विश्वकाेष सुद्दा तयार करण्यात आला असून आत्तापर्यंत याचे 34 खंड प्रकाशित झाले आहेत.
पुण्यातील येरवडा भागात डेक्कन काॅलेज हे अभिमत विद्यापीठ आहे. यामध्ये पुरातत्व, भाषशास्त्र आणि संस्कृत हे प्रमुख विभाग आहेत. या काॅलेजमध्ये शिक्षणाबराेबरच संशाेधन देखील चालते. याच काॅलेजच्या संस्कृत विभागामध्ये विविध भाषा पंडितांनी 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ आणि त्यांचे संदर्भ शाेधले आहेत. या ठिकाणी संस्कृत भाषेचा विश्वकाेष तयार करण्यात येत असून या विश्वकाेषाचे आत्तापर्यंत 34 खंड प्रकाशित झाले आहेत.
या संशाेधनाबाबत डेक्क्न काॅलेजचे प्र-कुलगुरु डाॅ. प्रसाद जाेशी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या विभागामध्ये संस्कृत शब्दकाेष प्रकल्प सुरु आहे. 1948 मध्ये या काेषाचा बीजाराेपण झालं. संस्कृत भाषेत जितके ग्रंथ आहेत. त्याचं वाचन सुरवातीला करण्यात आलं. 30 ते 40 अभ्यासकांनी प्रत्येक ग्रंथ मूळापासून वाचून दाेन हजार ग्रंथांमधून शब्दांची निवड केली. यातून 22 लाख शब्द काढण्यात आले. प्रत्येक शब्द काेठून आला, कुठे कुठे वापरण्यात आला याची नाेंद करण्यात आली. त्याचे संदर्भ शाेधण्यात आले. त्याचे 1 काेटी 20 लाख संदर्भ शाेधण्यात आले. या शब्दांच स्क्रिप्टाेरियम डेक्कन काॅलेजमध्ये तयार करण्यात आलं. आज जगात कुठल्याही शब्दावर संशाेधन करायचं असेल तर हे स्क्रिप्टाेरियम हे माेठं संसाधन आहे. अशाप्रकारे या विश्वकाेषाचे 34 खंड डेक्कन काॅलेजकडून प्रकाशित करण्यात आले आहेत.