पुरंदर विमानतळासाठी १४ हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:04 AM2018-05-09T04:04:05+5:302018-05-09T04:04:05+5:30
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी केंद्र शासनाकडून १४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम विमानतळाच्या भूसंपादनासाठी वापरली जाणार की बांधकामासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी केंद्र शासनाकडून १४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम विमानतळाच्या भूसंपादनासाठी वापरली जाणार की बांधकामासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, येत्या आठवड्याभरात याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुरंदर येथील प्रस्तावित श्री छत्रपती संभाजीराजे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मान्यतेसाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडून विविध टप्प्यांवर प्रयत्न केले जात आहेत. अखेर गेल्या आठवड्यात विमानतळाच्या जागेसाठी केंद्राच्या स्टेअरिंग कमिटीने हिरवा कंदील दिला. समितीने दिलेल्या निर्णयावर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची स्वाक्षरी झाली. त्यामुळे खासदार अनिल शिरोळे यांनी प्रभू यांचे टिष्ट्वटरवरून आभार मानले आहेत. देशातील ६ विमानतळासाठी केंद्राकडून ५० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातील १४ हजार कोटी रुपये पुरंदर विमानतळासाठी देण्यात आले आहेत. मात्र, विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही.