चाकुने वार करून लुटली १५ लाखांची रोकड; शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:54 PM2017-11-21T15:54:59+5:302017-11-21T15:58:09+5:30
शिरूर येथे जात असलेल्या रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या युवकास दोन अज्ञात चोरट्यांनी चाकूने वार करून त्यांच्याकडील १५ लाख ३०० रुपये रक्कम लुटून नेली असल्याची घटना सोमवारी (दि. २०) दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान घडली.
शिक्रापूर : पुणे-नगर रोडवर शिक्रापूर-कोंढपूरी (ता. शिरूर) दरम्यान येथे पेट्रोलपंप व इतर ठिकाणची रक्कम घेऊन शिरूर येथे जात असलेल्या रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या युवकास दोन अज्ञात चोरट्यांनी चाकूने वार करून त्यांच्याकडील १५ लाख ३०० रुपये रक्कम लुटून नेली असल्याची घटना सोमवारी (दि. २०) दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान घडली. याबाबत मोहसीन रफिक तांबोळी (वय ३०, रा. सूरजनगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन तांबोळी हा रेडीयंट कॅश मॅनेजमेंट या कंपनीत नोकरीस असून तो शिक्रापूर, रांजणगाव या भागातील पेट्रोलपंप, कुरियर, फायनान्स या भागातील रक्कम गोळा करून शिरूर येथील आयडीबीआय किंवा आयसीआयसीआय बँकेच्या खात्यामध्ये भरणा करत असतो. आज मोहसीन हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच १२ पी क्यू १५३८ या दुचाकीवरून निघाला. त्यांनतर त्याने रांजणगाव येथील श्रीराम फायनान्स मधील १६ हजार शंभर रुपये तसेच ईकॉम एक्स्प्रेस कुरियर येथील १ लाख ५१ हजार ७०९ रुपये घेतले. त्यांनतर शिक्रापूर येथे येऊन रिलायंस पेट्रोलपंप येथील १३ लाख ३२ हजार ५०४ रुपये रक्कम घेतली. यावेळी त्याच्याकडे एकूण गोळा झालेली १५ लाख ३१३ रुपये रक्कम त्याने जवळील बॅगेमध्ये ठेवली आणि सर्व रक्कम घेऊन शिक्रापूर येथील रिलायंस पेट्रोलपंपातून दुपारी बाराच्या दरम्यान दुचाकीवरून शिरूरच्या दिशेने निघाला, दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान पुणे नगर रस्त्यावरील हॉटेल हर्षराज समोरून जात असताना पाठीमागून दोन दुचाकीस्वार आले. त्यांनी मोहसीन याच्या दुचाकीला दुचाकी आडवी लाऊन थांबण्याची विनंती केली आणि मोहसीनच्या दुचाकीवरील बॅग ओढण्यास सुरवात केली, यावेळी मोहसीन याने प्रतिकार केला असता पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चालकाने पाठीमागे बसलेल्या युवकास खूपस, असे सांगितले. यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने मोहसीनच्या छातीवर चाकूने वार केला, आणि दोघांनी मोहसीनच्या दुचाकीवर ठेवलेले १५ लाख ३१३ रुपये रक्कम असलेल्या बॅग घेऊन शिरूरच्या दिशेने पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, गणेश वारुळे, प्रशांत माने, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, संदीप जगदाळे, अमित देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करत आहे.
घटनास्थळला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी देखील तातडीने घटनास्थळी भेट दिली असून आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र दोन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.