२४ हजार वृद्ध कलावंतांचे मानधन खात्यांत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:47 AM2018-04-09T04:47:21+5:302018-04-09T04:47:21+5:30
‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव’ पुरस्काराची रक्कम आॅनलाइन पद्धतीने देण्यात आली आहे, तसेच आतापर्यंत राज्यातील २४ हजार १७७ पात्र वृद्ध कलावंतांचे मानधन बँक खात्यात जमा केल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहे.
पुणे : ‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव’ पुरस्काराची रक्कम आॅनलाइन पद्धतीने देण्यात आली आहे, तसेच आतापर्यंत राज्यातील २४ हजार १७७ पात्र वृद्ध कलावंतांचे मानधन बँक खात्यात जमा केल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहे. वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित असल्याचा आरोप ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कट्टा’ कार्यक्रमांतर्गत केला होता.
विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार समिती तमाशातील ज्येष्ठ कलाकाराची या पुरस्कारासाठी निवड करते. आतापर्यंत प्रभाताई शिवणेकर, भीमाभाऊ सांगवीकर, गंगारामबुवा कवठेकर, राधाबाई खोडे नाशिककर, मधुकर नेराळ आदी मान्यवरांना ‘जीवनगौैरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कारप्राप्त कलाकाराच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांची एकत्रित रक्कम जमा होते, असे सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.