मतदानाच्या जनजागृतीसाठी सायकलवरुन २७० किलोमीटर प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 06:17 PM2019-04-22T18:17:10+5:302019-04-22T18:17:33+5:30
मुंढव्यात राहणारा सतेज हा सायकलचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्वत: सायकल चालवतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो.
पुणे : मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो बजावलाच पाहिजे, यासाठी प्रत्येक जण काही तरी हटके करून जनजागृती करीत आहे. पण एक सायकलिस्ट मतदान करण्यासाठी पुण्याहून सुमारे २७० किलोमीटर सायकलवर जाणार आहे. तसेच ठिकठिकाणी तो मतदान जागृती देखील करणार आहे. सतेज नाझरे असे त्या तरूणाचे नाव आहे.
मुंढव्यात राहणारा सतेज हा सायकलचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्वत: सायकल चालवतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो. नुकतेच त्याने मुंबई ते गोवा हा सात दिवसांत सायकलवर प्रवास पूर्ण केला होता. तसेच पुण्यातही सायकलस्वारांचा एक ग्रुप तयार करून त्याद्वारे प्रसार करीत आहे. सध्या निवडणुकीचे दिवस असल्याने तो सायकल चालवा आणि मतदान करा असा दुहेरी संदेश देत आहे.
पुण्याहून तो कर्नाटकातील निपाणीला २१ एप्रिल रोजी रात्री निघाला आणि २२ रोजी रात्री तिथे पोचणार आहे. सुमारे २७० किलोमीटरचे अंतर तो पार करणार आहे. या दरम्यान त्याने मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा, असे संदेश दिला. चिकोडी लोकसभा मतदारसंघात तो मतदान करणार आहे.
मतदान हा अधिकार आहे. परंतु, त्याबाबतची उदासिनता दिसून येते. त्यामुळे मी माझ्या गावी सायकलवरच जात असून, ठिकठिकाणी मतदानाचे महत्त्व सांगणार आहे. तसेच सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा असा संदेशही यातून मिळणार आहे.
- सतेज नाझरे, सायकलिस्ट