भिगवण येथे ४५ किलो चंदन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:38 AM2017-08-06T04:38:06+5:302017-08-06T04:38:06+5:30
पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान गुरुवारी २ लाख २५ हजार रुपयांच्या ४५ किलो सुगंधी चंदनासह ५ लाख रुपये किमतीची गाडी दोन आरोपींसह ताब्यात घेतल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे
भिगवण : पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान गुरुवारी २ लाख २५ हजार रुपयांच्या ४५ किलो सुगंधी चंदनासह ५ लाख रुपये किमतीची गाडी दोन आरोपींसह ताब्यात घेतल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एन. एम. राठोड यांनी दिली. चंदनाची तस्करी करणारे इंदापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती पुढे येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास विठ्ठल पवार (वय ३७, रा. वरकुटे खुर्द) तसेच सचिन ज्ञानेश्वर देशमाने (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गुरुवारी (दि. ३) भिगवण पोलीस कर्मचारी श्रीरंग शिंदे, रमेश भोसले, अनिल सातपुते भिगवण-राशीन रोडवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. दुपारी ३ च्या सुमारास राशीनकडून भिगवणकडे जाणाºया मोटारीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने पोलिसांना पाहून गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच पाठलाग करून जुन्या भिगवण गावातील जाधव पेट्रोल पंपाशेजारी ती गाडी अडविण्यात यश मिळविले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, या गाडीतील सीट फोल्ड करून पांढºया रंगाच्या युरियाचा पिशव्यांत सुगंधी चंदनाचे तुकडे ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी गाडी व आतील दोन आरोपींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. या दोन आरोपींपैकी हरिदास विठ्ठल पवार (वय ३७, रा. वरकुटे खुर्द) तसेच सचिन देशमाने (रा. निमगाव केतकी) हे दोघेही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली. सचिन देशमाने राष्ट्रीय किसान मोर्चाचा अध्यक्ष, तर पवार हा इंदापूर तालुका शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ५ लाख रूपये इतक्या किमतीचा माल जप्त केला आहे.
पांढरी कपडे अन् काळे धंदे
चंदनाची तस्करी करण्यासाठी आरोपींनी मोटारीचा वापर केला. तसेच, आरोपी देशमाने शेतकरी संघटनेचा पदाधिकारी आहे.
स्थानिक दैनिकाचा वार्ताहर म्हणूनही तो काम करीत असल्याची माहिती मिळते. तसेच, आणखीन काही संघटनेचे सदस्य असल्याची ओळखपत्रे सोबत बाळगत असल्याची माहिती मिळाली.
तर, पवारवर पूर्वीही चंदनतस्करीचे प्रकरणे असल्याची माहिती मिळाली.