स्वस्त धान्य वितरकांना ६९ लाखांचा दंड, परवाने कायमस्वरूपी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:57 AM2017-12-01T03:57:35+5:302017-12-01T03:57:50+5:30
‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही स्वस्त धान्य वितरकांकडून धान्यसाठा आणि वितरण यामध्ये अपहार करण्यात येत होता. याबाबतच्या तक्रारी मिळताच शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या भरारी पथकांनी शहरातील तीन दुकानदारांवर धाडी टाकून
पुणे : ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही स्वस्त धान्य वितरकांकडून धान्यसाठा आणि वितरण यामध्ये अपहार करण्यात येत होता. याबाबतच्या तक्रारी मिळताच शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या भरारी पथकांनी शहरातील तीन दुकानदारांवर धाडी टाकून त्यांच्या अपहाराचा पर्दाफाश केला आहे. या दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यांच्याकइून तब्बल ६९ लाख ५१ हजार ५२0 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरामध्ये अन्नधान्य वितरणची ११ परिमंडळीय कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील स्वस्त अन्नधान्य वितरण केंद्रांवर शासनाच्या आदेशानुसार ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्या आहेत. या मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांच्या अंगठ्याचा ठसा (थंब इम्प्रेशन) घेऊन स्वस्त धान्य वितरित केले जाते. अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेमधील धान्य वितरणामध्ये पारदर्शकता येण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
गरीब, गरजूंना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य देण्याऐवजी त्यांच्या स्वस्त धान्याचा बेकायदेशीरपणे साठा करून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. शासनाने ही फसवणूक टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमधूनही वितरक भ्रष्टाचाराचे नवनवीन मार्ग शोधत असल्याचे समोर आले आहे. या तीन विक्रेत्यांनी राज्य सरकारची आणि शिधापत्रिकाधारकांची फसवणूक केल्याचा प्रकार भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाºयांनी या दुकानांवर धाडी टाकून गहू आणि तांदूळ साठा पुस्तक, विक्री रजिस्टर, पावती पुस्तके यांची तपासणी केली असता हा अपहार उघडकीस आला.
माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत
कारवाई केलेल्या परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदारांबाबत
तक्रारी आलेल्या होत्या. या दुकानांवर भरारी पथकांद्वारे धाडी टाकण्यात आल्या. त्यांच्या मागील तीन महिन्यांतील गहू व तांदूळ साठा, विक्री रजिस्टरच्या नोंदी आणि शिधापत्रिकाधारकांना विक्री केल्याच्या पावत्या तपासण्यात आल्या. या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली असून त्यांना लेखी खुलासा मागण्यात आला होता. या तीनही परवानाधारकांनी समाधानकारक खुलासा दिला नाही. त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यासोबतच ६९ लाख ५१ हजार ५२0 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तसेच परवानेही कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहेत. - आर. बी. पोटे,
प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी (शहर)
कारवाईचा तपशील
स्वस्त धान्य वितरकांचे नाव दुकान दंडाची रक्क म
परवाना क्रमांक
अनमोल नारायणदास उणेचा १ ४४ लाख, ३७ हजार, ३२०
सुनीता अशोक अगरवाल ६१ १८ लाख, १५ हजार
लक्ष्मीबाई श्याम सोनवणे ६९ ६ लाख, ९९ हजार, २००
एकूणरक्कम — ६९ लाख, ५१ हजार, ५२०