मतदान केंद्रावर पुणे महापालिकेचे ७९६ आरोग्य सेवक कार्यरत; ६२५ व्हिलचेअर, ४७ ॲब्युलन्स, १२ वैद्यकीय अधिकारी सेवेत
By निलेश राऊत | Published: May 10, 2024 06:02 PM2024-05-10T18:02:49+5:302024-05-10T18:07:06+5:30
मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या ११ हजार १८८ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेत हे आरोग्य सेवक कार्यरत राहणार
पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदार संघासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत असून, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ७९६ आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या ११ हजार १८८ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेत हे आरोग्य सेवक कार्यरत राहणार आहेत.
पुणे महापालिकेच्या उपआरोग्य अधिकारी तथा कर्मचारी कल्याण कक्षाच्या नोडल अधिकारी डॉ.कल्पना बळीवंत यांनी याबाबत माहिती दिली. पुणे लोकसभा मतदार संघासाठी येत्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ५६८ मतदान केंद्राची ठिकाणे असून, येथील ३ हजार २७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष १० हजार १५६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर २० टक्के अधिकचा कर्मचारी वर्ग असे सर्व मिळून याठिकाणी ११ हजार १८८ कर्मचारी वर्ग असणार आहे.
या कर्मचाऱ्यांपैकी कोणाला वैद्यकीय उपचाराची गरज पडल्यास तात्काळ उपचार मिळावे म्हणून, महापालिकेच्यावतीने ७९६ आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हृदयरोगासारखी मोठी घटना घडल्यास, त्यांना तातडीने जवळच्या मोठ्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी ४७ खाजगी ॲम्ब्युलन्स उपलब्ध असतील. महापालिकेचे १२ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारीही आपल्या विधानसभा मतदार संघात राहणार आहेत. महापालिकेने मतदान केंद्रांसाठी १६ हजार ओ.आर.एसची पाकिटे उपलब्ध करून देण्यात आली असून, ५६६ मेडिकल फस्टएड किट (प्रथमोपचार पेटी) देण्यात आले आहेत.
खाजगी रूग्णालयात मोफत उपचार
महापालिकेने प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मोठ्या रूग्णालयांशी संपर्क साधून, त्यांच्याकडून निवडणुक कर्मचाऱ्यांवर मोफत (कॅशलेस) उपचार करण्याबाबतचे हमीपत्र घेतले आहे. या वैद्यकीय उपचाराची बिले ही नोडल अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविली जातील. व त्यांच्याकडून ती अदा केली जाणार आहेत. ७ मे रोजी बारामती मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी दोन कर्मचाऱ्यांना फिट आली असता, त्यांना दोन खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मतदानाच्या दिवशी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना अपघात झाला किंवा काही दुर्घटना घडल्यास त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेचे ७९६ आरोग्य सेवक प्रथमोपचार पेटीसह कार्यरत राहणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रासाठी व्हिलचेअर देण्यात आल्या असून, ही संख्या ६२५ आहे. - डॉ. कल्पना बळीवंत, उपआरोग्य अधिकारी पुणे महापालिका.