महावितरणच्या तारांचा शॉक लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 09:48 AM2024-03-19T09:48:28+5:302024-03-19T09:48:42+5:30
बांधकाम सुरू असताना लोखंडी शिडी नकळत विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांना स्पर्श झाली, त्यात तरुणास विजेचा धक्का बसून तो खाली पडला
नसरापूर : वरवे बु.( ता भोर) येथे घरकुलाचे बांधकाम सुरू असताना महावितरणच्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांना लोखंडी शिडी लागल्याने ओंकार जगन्नाथ भंडारी (वय २२) याचा जागेवरच मृत्यू झाला.
विजय गुंडय्या भंडारी यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ओंकार व त्याचे कुटुंबीय भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी गावालगत घरकुलाचे काम सुरू केले आहे. बांधकामाजवळ महावितरणच्या विद्युत वाहून नेणाऱ्या तारांचे खांब आहेत. विद्युत वाहून नेणाऱ्या तारा खाली आल्याचे महावितरण कार्यालयास यापूर्वी सांगितले होते असे ओंकारच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. रविवारी (दि.१७ ) दुपारी बांधकाम सुरू असताना बांधकाम साहित्यातील लोखंडी शिडी नकळत विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांना स्पर्श झाली त्यामध्ये ओंकार यास विजेचा झटका बसल्याने त्यास घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. त्याध्या जवळ एक लोखंडी पाइप पडला होता अन् त्याच्या हातापायासह अंगावर भाजल्याह्या जखमी झाल्या होत्या, असे त्याचे चुलते विजय गुंडय्या भंडारी यांनी पोलिसांना सांगितले. अपघातानंतर घरातील सदस्यांनी त्यास खासगी वाहनाने नसरापूर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून तो इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे सांगितले.