आबा बागूल यांनी अनेक विकासकामे केली आहेत, त्यांना आता मुंबईला पाठवा - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:32 AM2017-09-27T05:32:52+5:302017-09-27T05:33:23+5:30
पुणे : विकासकामे करताना कल्पकताही असली पाहिजे. अशाच कल्पकतेने गेली सलग ३० वर्षे नगरसेवकपदाच्या माध्यमातून काम करून आबा बागूल यांनी अनेक विकासकामे उभी केली. आता त्यांना मुंबईला पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
पुणे नवरात्री महोत्सवांतर्गत शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिराला शरद पवार यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी बोलताना त्यांनी बागूल यांचे कौतुक केले. उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, चेतन तुपे, पुणे नवरात्री महोत्सवाचे पदाधिकारी, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. बागूल नागरिकांना काशीयात्रा घडवतात, त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर येथेही घेऊन जावे, त्यातून देश समजण्यास मदत होईल, अशी सूचना पवार यांनी केली. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचे कौतुक करत पवार यांनी बागूल यांनी उभ्या केलेल्या तारांगण प्रकल्पाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. घनशाम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी माता मंदिरात महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यात रोज रात्री पाककृती स्पर्धा व अन्य अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत. तसेच गणेश कला, क्रीडा मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना बुधवारी (दि. २७) गणेश कला, क्रीडा मंदिर येथे महर्षी पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.