आंतरराष्ट्रीय पडद्यावर झळकणार ‘आजीबाईचा बटवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:42 PM2018-10-06T14:42:59+5:302018-10-06T14:57:08+5:30

वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली असली, तरी तब्येतीच्या लहान-मोठ्या तक्रांरीसाठी आजही ‘आजीबाईचा बटवा’ हाच रामबाण उपाय ठरतो.

'Aajibai batwa' to be seen on international screen | आंतरराष्ट्रीय पडद्यावर झळकणार ‘आजीबाईचा बटवा’

आंतरराष्ट्रीय पडद्यावर झळकणार ‘आजीबाईचा बटवा’

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘आजीबाईचा बटवा’ चा समावेश असून, ७ आॅक्टोबरला लखनऊमध्ये झळकणार या महोत्सवासाठी जगभरातील १० लघुपटांची निवड पुण्यातील ‘बायसिकल’ या लघुपटाचीही या महोत्सवासाठी निवड

पुणे : वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली असली, तरी तब्येतीच्या लहान-मोठ्या तक्रांरीसाठी आजही ‘आजीबाईचा बटवा’ हाच रामबाण उपाय ठरतो. हळद, कोरफड, लिंबू अशा घरगुती वस्तूंची उपयुक्तता एका चिमुरडीने ‘आजीबाईचा बटवा’ या लघुपटातून सहजतेने मांडली आहे. हा लघुपट आता आंतरराष्ट्रीय पडद्यावर झळकणार असून, हजारो परदेशी प्रेक्षकांना ही गुरुकिल्ली अनुभवता येणार आहे. या लघुपटामध्ये इंग्रजीत उपशीर्षकही देण्यात आले आहेत. याशिवाय, पुण्यातील सिध्दार्थ दामले या विद्यार्थ्याच्या ‘बायसिकल’ या लघुपटाचीही या महोत्सवासाठी निवड झाली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकणा-या कस्तुरी कुलकर्णी या विद्यार्थिनीने ‘आजीबाईचा बटवा’ हा १० मिनिटांचा लघुपट तयार केला आहे. पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही धुरा तिनेच सांभाळल्या आहेत. लखनऊमध्ये आजपासून (६ आॅक्टोबर) सुरु होत असलेल्या इंटरनॅशनल सायन्स, लिटरेचर अँड फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील १० लघुपटांची निवड झाली असून, यामध्ये ‘आजीबाईचा बटवा’ या लघुपटाचा समावेश आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना कस्तुरीची आई सुरेखा कुलकर्णी म्हणाल्या, ‘कस्तुरीला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे. तिने अनेक नाटकांच्या शिबिरामध्ये सहभाग घेतला. चार वर्षांपूर्वी तिने लघुपटाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. मागील वर्षी फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान भारतीतर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आयोजक नंदिनी कोठारकर यांनी कस्तुरीला विज्ञानाशी संबंधित लघुपट करण्याची कल्पना सुचवली. भारतीय विज्ञान संस्कृतीची उपयुक्तता देशभरात पोहोचावी, यासाठी तिने आजीबाईचा बटवा ही संकल्पना निवडली. हा लघुपट फेब्रुवारी महिन्यात गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियामध्ये शॉर्टलिस्ट झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल सायन्स, लिटरेचर अँड फिल्म फेस्टिव्हलतर्फे आम्हाला या लघुपटाबाबत विचारणा करण्यासाठी ईमेल आला होता. या महोत्सवासाठी जगभरातील १० लघुपट निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये ‘आजीबाईचा बटवा’ चा समावेश असून, ७ आॅक्टोबरला लखनऊमध्ये झळकणार आहे.’ यापूर्वी कस्तुरीचा ‘कल्हई- चमकिला पितल’ या लघुपटाने नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. ‘आजीबाईचा बटवा’ या लघुपटासाठी कस्तुरीला फर्ग्युसनचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कस्तुरी स्वातंत्र्यवीर सावरकर, कृष्ण आदी विषयांवर किर्तन करते. तिला भविष्यात चित्रपट दिग्दर्शन अथवा सायन्टुनिस्ट (कार्टुन सायंटिस्ट) या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे.

Web Title: 'Aajibai batwa' to be seen on international screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे