अबब....देशात सव्वा अब्ज मोबाईल!!!; दिल्लीत सर्वात जास्त मोबाईलधारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 03:29 PM2017-12-07T15:29:20+5:302017-12-07T15:34:02+5:30
दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली.
विशाल शिर्के
पुणे : जगाची लोकसंख्या ही साडेसात अब्ज इतकी मानली जाते. त्यात चीन पाठोपाठ देशाची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. यात मोबाईलची संख्या पाहिल्यास ही तब्बल १२१ कोटी इतकी भरते. दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली.
चीनची लोकसंख्या ही १३८ कोटी दरम्यान आहे. त्यानंतर भारतात १३२ कोटी ४१ लाख जनसंख्या येते. वापराच्या आणि किंमतीच्या दृष्टीने मोबाईल आवाक्यात आल्याने दूरसंचार उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. वैयक्तिक संपर्काच्या दृष्टीने उपयोगित असल्याने अगदी गरीबातील गरीब आणि श्रीमंताच्या हातात या यंत्राने आपले स्थान पक्के केल्याचे दिसून येत आहे.
दूरसंचार विभागाने दिलेल्या प्रफुल सारडा यांना ३१ आॅगस्ट २०१७ अखेरपर्यंतची मोबाईलची आकडेवारी माहिती अधिकारात उपलब्ध करुन दिली आहे. त्या नुसार राजधानी दिल्लीने प्रथम क्रमांक पटाकविला आहे. येथे दर शंभर लोकसंख्येमागे २४६.१४ मोबाईल आहेत. पाठोपाठ कोलकाता येथे १८४.३६ आणि मुंबईत १५४.६८ मोबाईल आहेत. हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळा, पंजाब आणि तमिळनाडूत प्रतिशंभर लोकसंख्येमागे सरासरी शंभराहून अधिक मोबाईल आहेत. मुंबई वगळून उर्वरीत महाराष्ट्रात दरशंभर लोकसंख्येमागे ९४.१२ मोबाईल आहेत.
मोबाईलवापरात बिहार सर्वात गरीब राज्य ठरले असून, येथील सरासरी अवघी ६०.८२ इतकी आहे. नीचांकी मोबाईल वापरात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आसाममध्ये शंभरामागे ६६.९० मोबाईल आहेत. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात हाच दर ७३.९० इतका आहे. एकूण देशाचा विचार करता, शंभर लोकसंख्येमागे मोबाईलची संख्या ९१.९० इतकी आहे.
शंभर लोकसंख्येमागे मोबाईलची संख्या
राज्य मोबाईल
आंध्रप्रदेश ९५.३०
आसाम ६६.९०
बिहार ६०.८२
गुजरात ११२.३९
हरयाणा ९०.०२
हिमाचल प्रदेश १४९.०९
जम्मू काश्मीर ९९.२४
कर्नाटका १११.८१
केरळ ११३.१४
मध्यप्रदेश ६७.५३
महाराष्ट्र ९४.१२
उत्तर-पूर्व भारत ९१.३३
ओडिसा ८०.४०
पंजाब ११८.२७
राजस्थान ९०.२३
तमिळनाडू १२६.६८
उत्तरप्रदेश ७३.९०
पश्चिम बंगाल ७३.३७
कोलकाता १८४.३६
दिल्ली २४६.१४
मुंबई १५४.६८
—————————————----------
एकूण ९१.९०
कथा मोबाईलची
अमेरिकेतील मार्टीन कुपर यांनी १९७३ साली प्रथम मोबाईलवरुन डॉ. जोएल एंगल यांना कॉल केला. त्यानंतर १९८० नंतर व्यावसायिक स्तरावर त्याची सुरुवात व्हायला लागली. देशात १९९५ साली तत्कालिन दूरसंचार मंत्री सुखराम यांनी पश्चिम बंगालचे तत्कालिन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पहिला मोबाईल कॉल केला. त्यानंतर २००५ सालानंतर देशात मोबाईलधारकांची संख्या झपाट्याने वाढू लागली.