कुत्र्यांपासून सावधान ! पुण्यात दाेन हजारहून अधिक नागरिकांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:44 PM2018-03-27T16:44:34+5:302018-03-27T16:44:34+5:30
पुणे अाणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत वाढत असून गेल्या दाेन महिन्यात पुण्यात दाेन हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे.
पुणे : कुत्रा हा मानवाच्या जवळचा मित्र असताे असे म्हंटले जाते, मात्र हाच कुत्रा अाता मानवाचा शत्रू बनत चालला असल्याचे चित्र अाहे. महापालिकेच्या राेजच्या अहवालानुसार जानेवारी अाणि फेब्रुवारी या केवळ दाेन महिन्यात पुण्यातील तब्बल दाेन हजार पासष्ट नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक असून यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली अाहे.
नुकताच पिंपरी-चिंचवड मध्ये घराच्या अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके ताेडल्यामुळे ते मुल गंभीर जखमी हाेऊन मृत्यूमुखी पडले. लहान मुलांना भटकी कुत्री चावल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून घडली अाहेत. त्याचबराेबर दुचाकींच्या मागे ही भटकी कुत्री लागल्यामुळे अनेकांचे अपघातही झाले अाहेत. यंदाच्या वर्षी महापालिकेच्या अहवालानुसार जानेवारीमध्ये 821 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला हाेता तर फेब्रुवारी महिन्यात तब्बल 1244 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला हाेता. याचे गणित केल्यास फेब्रुवारी महिन्यात दिवसाला तब्बल 44 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे स्पष्ट हाेत अाहे.
या भटक्या कुत्र्यांच्याविराेधात पालिका प्रशासन पाऊले उचलत असलं तरी ती पुरेशी नसल्याचे दिसून येत अाहे. उघड्यावर फेकण्यात येणारा कचरा, फेकण्यात येणारे खरकाटे अन्न यांमुळे या भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. पालिका प्रशासनाला या कुत्र्यांची नसबंदी करताना अनेक गाेष्टी लक्षात घ्याव्या लागत असल्याने हा उपाय पुरेसा उपयाेगी पडत नसल्याचे चित्र अाहे. तसेच काही नागरिकांकडूनही या भटक्या कुत्र्यांना अन्न टाकण्यात येत असल्याने साेसायटींच्या बाहेरही त्यांची संख्या वाढत अाहे. कुत्रा चावल्याने रेबिज सारखे अाजार हाेत असल्याने तसेच इंजेक्शनचा काेर्स करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये या कुत्र्यांबद्दल धास्ती निर्माण झाली अाहे.