पाबळ दरोड्यातील चारही आरोपींवर मोक्काची कारवाई
By admin | Published: February 28, 2016 03:41 AM2016-02-28T03:41:58+5:302016-02-28T03:41:58+5:30
पाबळ येथे १७ डिसेंबर २0१५ रोजी झालेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. या चारही आरोपींवर आता
शिक्रापूर : पाबळ येथे १७ डिसेंबर २0१५ रोजी झालेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. या चारही आरोपींवर आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती दौंडचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे दिली.
चंग्या ऊर्फ संदेश रामलाल ऊर्फ रमेश काळे (वय २३, रा.कोळगाव, ता. श्रीगोंदा) व शरद ऊर्फ शेऱ्या आप्पासाहेब काळे (वय २१, रा.रांजणगाव मस्जीद,ता. पारनेर), प्रवीण ऊर्फ फल्या आकार्शा काळे (वय २५) व श्रीक्रुष्ण ऊर्फ लंगड्या आकार्शा काळे (वय २0, दोघेही राहणार रा.रांजणगाव मशीद, घाडगेवाडी,ता. पारनेर,जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी सांगितले, की यातील मुख्य आरोपी चंग्या ऊर्फ संदेश काळे याच्यावर पंधरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात दोन गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली आहे. खून, दरोडे असे गंभीर गुन्हे आरोपींवर आहेत. अहमदनगर, बेलवंडी, सुपा, शिक्रापूर, कोतवाली एमआयडीसी आदी परिसरात आरोपींनी गंभीर गुन्हे केले आहते. या गंभीर गुन्ह्यांमुळे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली.
१७ डिसेंबर २0१५ रोजी पहाटे पाबळ येथील फुटाणवाडी व फणसे मळा या दोन ठिकाणी आरोपींनी बगाटे व पिंगळे कुटुंबांवर सशस्त्र दरोडा टाकला होता. त्यांनी केलेल्या मारहाणीत रखमाबाई बगाटे व दिनेश पिंगळे या दोघांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.