अतिरिक्त आयुक्त मारहाण प्रकरण ; मनपा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 05:38 PM2019-02-12T17:38:28+5:302019-02-12T17:39:45+5:30
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काल महापाैर दालनात काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी मारहान केली हाेती. त्याच्या निषेधार्थ आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केले.
पुणे : पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काल महापाैर दालनात काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी मारहान केली हाेती. त्याच्या निषेधार्थ आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केले. या आंदाेलनात निंबाळकर देखील सहभागी झाले हाेते. पालिकाभवनात असलेल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमाेर हे आंदाेलन करण्यात आले.
नदीमधील जलपर्णी काढण्याच्या निविदेचा विषय गेले काही दिवस चर्चेत आहे.या विषयावरून महापौरांच्या दालनासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनानंतर सुरु असलेल्या चर्चेत स्पष्टीकरण देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर दालनात आले. मात्र ज्यांचा निविदा प्रक्रियेत समावेश होता त्यांनी स्पष्टीकरण देऊ नये अशी नगरसेवकांची मागणी होती. त्यावेळी सुरु असलेल्या चर्चेत 'अधिकारी चोर आहेत', असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी 'असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे', असे सुनावले. यामुळे नगरसेवक संतप्त झाले.
तुम्ही आमची लायकी काढणारे कोण, असे म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले. त्यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्या श्रीमुखात भडकवली. याचे पडसाद आज महापालिकेच उमटले. पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज काम बंद आंदाेलन केले. तसेच कालच्या घटनेचा तीव्र निषेध केला.