पुणे विद्यापीठाचं अखेर एक पाऊल मागे, कीर्तनकार शेलारमामा सुवर्णपदक स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:06 PM2017-11-11T18:06:53+5:302017-11-11T18:26:11+5:30
पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावाने पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यास देण्यात येणारे सुवर्णपदक स्थगित करण्यात आल्याचा निर्णय कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी जाहीर केला.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावाने पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यास देण्यात येणारे सुवर्णपदक स्थगित करण्यात आल्याचा निर्णय कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी जाहीर केला.
शेलारमामा सुवर्णपदकासाठी शाकाहाराची अट घालण्यात आल्याचे उजेडात आल्याने तो वादाच्या भोवर्यात सापडला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २००६ पासून विज्ञानेत्तर विभागात पदवीव्युत्तर शिक्षण घेणार्या एका विद्यार्थ्यास शेलारमामा सुवर्ण पदक देण्यात येत होते. शुक्रवारी त्यासाठी अर्ज मागणारे परिपत्रक विद्यापीठाकडून संकेतस्थळावर टाकण्यात आले होते. त्यामध्ये शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे पदक देण्याची अट असल्यावरून मोठा गदारोळ झाला होता. विद्यार्थी संघटनांनी या पार्श्वभूमीवर या परिपत्रकाची होळी करून निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘शेलारमामा पारितोषिक २००६ पासून दिले जाते. शेलारमामा सुवर्णपदकासाठी घातलेल्या अटी त्यांच्या कुटुंबीयांनी घातलेल्या आहेत, त्या विद्यापीठाच्या नाहीत. विद्यापीठ आहारातील भेदभाव मानत नाही. विद्यापीठाकडून शेलारमामा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु असून त्यांना शाकाहाराची अट काढण्यासाठी विनंती करण्यात आले आहे. तोपर्यंत शेलारमामा सुवर्णपदक मागे घेण्यात आले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी यास मान्यता न दिल्यास हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करु. विद्यापीठाकडुन लोकांनी दिलेल्या देणग्यांच्या आधारे अशा प्रकारचे ४० पुरस्कार दिले जातात. या सर्व पुरस्कारांच्या नियम आणि अटींचा नव्याने आढावा घेतला जाईल.’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये देशभरातून तसेच परदेशातूनही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. विविध सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या भारतामध्ये खानपानाच्या सवयीमध्ये मोठी भिन्नता आहे. त्यामुळे सुवर्णपदकासाठी शाकाहार बंधनकारक अयोग्य असल्याचे मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आले होते.
शाकाहाराबरोबरच आणखी काही अटी या पदकासाठी घालण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार, विचार, भारतीय परंपरा मानणारा व स्वत:च्या दैनंदिन जीवनात करणारा असावा. विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा. ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणार्या विद्यार्थ्यास प्राधान्य आहे. गायन, नृत्य, वक्तृत्व, नाट्य व इतर कलांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेला असावा आदी अटी या पदकासाठी घालण्यात आलेल्या आहेत.