नागेश्वराचे प्राचीन मंदिर मोजतेय अखरेच्या घटका
By admin | Published: December 11, 2015 12:50 AM2015-12-11T00:50:36+5:302015-12-11T00:50:36+5:30
अनेक प्राचीन वास्तूंमुळे जुन्नर तालुक्याचा नावलौकिक नेहमीच उंचावत राहिला आहे. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीप्रमाणे जुन्नर तालुक्यातील प्राचीन वैभवसंपदा पर्यटकांना भुरळ घालणारी आहे.
मढ : अनेक प्राचीन वास्तूंमुळे जुन्नर तालुक्याचा नावलौकिक नेहमीच उंचावत राहिला आहे. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीप्रमाणे जुन्नर तालुक्यातील प्राचीन वैभवसंपदा पर्यटकांना भुरळ घालणारी आहे. मात्र, हीच प्राचीन वैभवसंपदा काळाच्या ओघात दिवसेंदिवस नष्ट होत असून, अनेक प्राचीन वास्तू अखेरचा श्वास घेत आहेत. मढपासून अवघ्या ९ किलोमीटर अंतरावर खिरेश्वर येथे असलेले नागेश्वराचे अतिप्राचीन मंदिर दुरवस्थेमुळे सध्या अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे.
मंदिराच्या बाहेर वर अनेक ठिकाणी मूर्ती बसविल्याने या मूर्ती कुतूहलाने कुणाची तरी वाट पाहत आहेत, असा भास होतो. या मूर्ती
मंदिर परिसरात कुठेही दिसून येत नाहीत.
> सुमारे ९व्या-१०व्या शतकातील शिलाहार वंशातील निसर्गपूजक शिवभक्त झंज राजाने त्र्यंबकपासून भीमाशंकरपर्यंत एकूण १२ शिवालये बांधली. त्यांतील ३ शिवालये ही जुन्नर तालुक्यात आहेत. पारुंडे येथे मीना नदीतीरावर ब्रह्मनाथी मंदिर, कुकडी नदीच्या तीरावर कुकडेश्वर मंदिर व पुष्पावती नदीच्या तीरावर खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिर आहे. ब्रह्मनाथी व कुकडेश्वर वर्दळीच्या ठिकाणी असल्याने या मंदिरांची नेहमीच डागडुजी होते. एक संवेदनशील समाज म्हणून लोकांनी एकत्र येऊन जर खिरेश्वराचे मंदिर वाचविण्यासाठी प्रयत्न केले, तर आपल्या पुढील पिढ्यांना खिरेश्वराचे मंदिर केवळ फोटोत नाही तर खरेखुरे पाहायला मिळेल, असे जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी सांगितले.
> नागेश्वराच्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यानंतर, त्या ठिकाणच्या छताला गंधर्वाच्या १६ विविध रूपांतील मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांतून आपणास भिन्नभिन्न शक्तींचा अर्थबोध होतो. त्याचपैकी ३ मूर्ती संपुष्टात आलेल्या आहेत. याच छताच्या मधोमध पिंपळवृक्षाच्या मुळांनी मंदिरात प्रवेश केल्याने येथील एक मूर्ती तुटून नामशेष झाल्याने तेथूनच मुळांनी प्रवेश केल्याचे दिसून येते. त्याच मुळांना घंटा अडकविण्यात आलेली आहे. ही मुळे वेळीच काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केली नाही, तर पुढील काळात येथील मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
- रमेश खरमाळे, माजी सैनिक