...आणि भरधाव बस बाभळीच्या झाडाजवळून शेतात उभी राहते...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 04:04 PM2018-02-03T16:04:23+5:302018-02-03T16:08:53+5:30
बारामतीहून इंदापूरकडे ३२ प्रवासी घेऊन भरधाव वेगाने एसटी बस निघाली होती. अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटतो आणि क्षणार्धात चालकाचा बसवरील ताबा सुटतो. बस रस्त्याच्या विरूद्ध दिशेला एका जुन्या बाभळीच्या झाडाच्या दिशेने जाते.
वालचंदनगर : वेळ सकाळी १०:४५ ची... बारामतीहून इंदापूरकडे ३२ प्रवासी घेऊन भरधाव वेगाने एसटी बस निघाली होती. अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटतो आणि क्षणार्धात चालकाचा बसवरील ताबा सुटतो. बस रस्त्याच्या विरूद्ध दिशेला एका जुन्या बाभळीच्या झाडाच्या दिशेने जाते. प्रवासी भितीने घट्टमुठी आवळून डोळे मिटून घेतात. मात्र, सुदैवाने बस बाभळीच्या मोठ्या झाडाजवळून मक्याच्या शेतात जाऊन उभी राहते आणि प्रवाशांना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय येतो.
ही घटना अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील दळवी वस्ती परिसरात शनिवार दि ३ रोजी सकाळी १०:४५ दरम्यान घडली आहे. इंदापूर आगाराची बस (क्रमांक एम एच १२ ई एफ ६६१३) बारामतीहून इंदापूरकडे ३२ प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस दळवी वस्तीनजीक आली असता अचानकपणे बसचा स्टेरिंग रॉड तुटला. यावेळी चालक हरिदास गिते यांचा वाहनावरील पूर्णपणे ताबा सुटला आणि बसने अचानकपणे रस्त्याच्या विरूध्द बाजूने वेग धरला. समोर जुने बाभळीचे मोठे झाड होते. मात्र सुदैवाने बसने अचानक वळून मक्याच्या शेतात जाऊन उभी राहिली. बस रस्ता सोडून खाली जात असताना मोठा खड्डा होता त्यामुळे खड्ड्यात बस आदळून चालकाच्या बाजूचा पुढील टायर तुटला. त्यामुळे बसमधील प्रवाशी जोरात आदळल्याने जवळपास १० ते १२ प्रवाशांना डोक्याला व चेहऱ्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे अपघातग्रस्त बस ज्या ठिकाणी थांबली तेथून पुढे अवघ्या १० ते १५ फुटावर सुदर्शन थोरात यांचे घर व दुकान होते. त्यामुळे हे कुटूंब बचावले. या मार्गावर वाहनांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले.