शिष्यवृत्तीचे अर्ज आॅफलाइन; महाडीबीटी पोर्टल बंद, महा ई-स्कॉलवर पुन्हा अर्ज स्वीकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:59 PM2018-02-01T12:59:41+5:302018-02-01T13:04:47+5:30
महाडीबीटी पोर्टल अकार्यक्षम ठरल्यामुळे राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पुन्हा एकदा महा ई-स्कॉल पोर्टलच्या सहाय्याने शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनांसह विविध कामांसाठी सुरू करण्यात आलेले महाडीबीटी पोर्टल अकार्यक्षम ठरल्यामुळे राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पुन्हा एकदा महा ई-स्कॉल पोर्टलच्या सहाय्याने शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून महा ई-स्कॉलवरून आॅफलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे. तसेच शिष्यवृत्तीबाबत तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे महा ई-स्कॉल या जुन्या प्रणालीवरील सन २०१६-१७ या वर्षातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित व नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज २०१७-१८ या वर्षामध्ये संबंधित महाविद्यालयांमार्फत पूर्वीप्रमाणेच महा ई-स्कॉल प्रणालीवरील कार्यपद्धतीनुसार नूतनीकरण करून घ्यावेत. तसेच संबंधित समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, शुल्क प्रतिपूर्ती योजनेची रक्कम आधार संलग्न बँक खात्यावर मंजूर करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे नवीन २०१७-१८ करिता महाविद्यालयांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथमच प्रवेश घेतला आहे. तसेच ज्यांना काही तांत्रिक कारणामुळे महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरणे शक्य झाले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी महा ई-स्कॉल प्रणालीवर अपलोड करण्यात आलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करून, पूर्ण अर्ज भरून, सर्व कागदपत्रांच्या प्रतीसह महाविद्यालयास आॅफलाइन तत्काळ जमा करावयाचा आहे. महाविद्यालयांनी आॅफलाइन पद्धतीने स्वीकारून कागदपत्रांची तपासणी करावी, असेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले.
प्राचार्यांवर सोपविली जबाबदारी
महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे महाविद्यालयीन नवीन विद्यार्थ्यांचे आॅफलाइन प्रस्ताव येत्या १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत स्वीकारण्याची तसेच जुन्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्ययावत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याच कालावधीत सर्व कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करणे आणि आधार संलग्न बँक खात्याची तपासणी करणे आवश्यक आहे.