शालेय जीवनापासूनच कलेची मूल्ये रुजवावी : अलारमेल वल्ली; पुण्यात ‘नूपुरनाद महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:49 AM2018-02-03T11:49:51+5:302018-02-03T11:53:30+5:30

नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे.

Art values ​​from school life: Alarmael Valli; 'Nupurnad Mahotsav' in Pune | शालेय जीवनापासूनच कलेची मूल्ये रुजवावी : अलारमेल वल्ली; पुण्यात ‘नूपुरनाद महोत्सव’

शालेय जीवनापासूनच कलेची मूल्ये रुजवावी : अलारमेल वल्ली; पुण्यात ‘नूपुरनाद महोत्सव’

Next
ठळक मुद्दे 'कलेची जाण असणारे आणि संगीताशी नाळ जुळलेले दर्दी रसिक पुण्यातच पाहायला मिळतात''तरुणांमध्ये नृत्यकलेबद्दलचे प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज'

पुणे : नृत्य आणि संगीत हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. कलात्मक माध्यमं कुठलेही असो, कलेतून रसिक आणि कलाकारांचा एकमेकांशी संवाद घडत असतो. मात्र आज नृत्यातील ‘रसिकत्व’ भाव काहीसा हरवला आहे. युवा पिढीला नृत्याचे कार्यक्रम बोअरिंग वाटतात ही वस्तुस्थिती आहे. नृत्यविषयक जनजागृतीचा अभाव हे याचे प्रमुख कारण आहे. कलेतील गुंतवणूक वाढवायची असेल तर शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये कलेची मूल्य रुजविली गेली पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नृत्यांगना अलारमेल वल्ली यांनी व्यक्त केली. 
नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे. त्यानिमित्त महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रसिद्ध नृत्यांगना स्वाती दैठणकर आणि नूपुर दैठणकर उपस्थित होते. 
चेन्नईप्रमाणे पुणे हेदेखील सांस्कृतिक हब बनले आहे. कलेची जाण असणारे आणि संगीताशी नाळ जुळलेले दर्दी रसिक पुण्यातच पाहायला मिळतात, अशा शब्दांत वल्ली यांनी पुण्याविषयी गौरवोद्गार काढले. नृत्य आणि संगीत हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. 
संगीतामध्ये  रसिक आणि कलाकारांचा एकमेकांशी आंतरिक संवाद घडतो. नृत्यामध्ये साहित्य, निसर्गसौंदर्य, संस्कृती अशा सर्व गोष्टींचा आस्वाद घेता येतो. वेशभूषा, नृत्यशैली, भाव याच्या सादरीकरणातून एका अद्वितीय कलाविष्काराची अनुभूती मिळते. परंतु नृत्यविषयक ज्ञानाच्या अभावामुळे नृत्यकलेमध्ये युवा पिढी फारसा रस घेताना दिसत नाही, तरुणांमध्ये नृत्यकलेबद्दलचे प्रबोधन करण्यासाठी शासन, कलाकार, कॉर्पोरेट आणि पालक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

कलेची कम्युनिटी एकच 
सध्या देशात अशांतता, असहिष्णुता या गोष्टी पाहायला मिळत आहेत. मात्र कला तू भारतीय, तू पाकिस्तानी अशा स्वरूपाचा धर्म किंवा जातिभेद मानत नाही. कला दोन भाषा आणि प्रांतांत सेतू बांधण्याचे काम करते. कलेची कम्युनिटी एकच आहे, अशा शब्दांत त्यांनी कलेचे महत्त्व विशद केले.

तमिळनाडूमध्येही हा प्रयोग व्हावा
महाराष्ट्र शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांना कलेसाठी अतिरिक्त गुण देण्याचा जो निर्णय घेतला त्याचे वल्ली यांनी स्वागत केले. महाराष्ट्राप्रमाणे तमिळनाडू राज्यानेदेखील हा प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कलेमध्ये इन्स्टंट फॉर्म्युला नाही
सध्या पैसा आणि झटपट प्रसिद्धीमुळे रिअँलिटी शोकडे पालकांचा कल वाढत आहे. मात्र कलेमध्ये असा इन्स्टंट फॉर्म्युला नसतो. कलेबद्दल श्रद्धा, साधना आणि भक्ती असणे महत्त्वाचे आहे. कला मन:शांती देते, याकडे वल्ली यांनी लक्ष वेधले.

Web Title: Art values ​​from school life: Alarmael Valli; 'Nupurnad Mahotsav' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.