लोणावळा शहराला सुंदर बनविण्यासाठी सरसावला आर्टिस्ट ग्रुप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 12:55 PM2017-11-13T12:55:06+5:302017-11-13T12:55:26+5:30
लोणावळा शहरात सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवत शहराला सुंदर बनविण्यासाठी लोणावळ्यातील आर्टिस्ट ग्रुपने पुढाकार घेतला आहे.
लोणावळा - लोणावळा शहरात सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवत शहराला सुंदर बनविण्यासाठी लोणावळ्यातील आर्टिस्ट ग्रुपने पुढाकार घेतला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या नगरपरिषद मालकीच्या तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारा उदबोधक संदेश व छायाचित्र रंगविण्याचे काम हा आर्टिस्ट ग्रुप करणार आहे.
लोणावळा शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून शहर स्वच्छ सुंदर व कचरामुक्त तसेच निर्मल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य सभापती पुजा गायकवाड यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शहरात स्वच्छेबाबतची कामे व प्रबोधन मोहिम सुरु आहे. नगरपरिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी, शहरातील विविध सामाजिक संस्था व जागृत नागरिक तसेच मान्यवर मंडळींनी यामध्ये पुढाकार घेत झोपडपट्टी ते उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती सुरु केली आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत, ओला व सुका कचरा कोणता व तो वर्गीकरण कसा करावा, सुक्या कचर्यापासून घरच्या घरी खत निर्मिती, कचरा निर्माण होणार नाही याकरिता काय करावे अशी माहिती देण्याचे काम सर्व स्तरावर सुरु आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच मुख्य रस्त्याच्या कडेला नगरपरिषदेच्या तसेच खाजगी मालमत्ताधारकांच्या अनेक भिंती आहेत. त्या सर्व भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे उदबोधक वाक्य व चित्र रंगविण्यात येणार आहे. लोणावळा शहरातील आर्टिस्ट ग्रुपने यामध्ये पुढाकार घेतला असून या उपक्रमात सर्व हौशी कलाकारांनी, कला शिक्षकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कामाकरिता लागणारे रंग व इतर सर्व साहित्य नगरपरिषद पुरविणार आहे. हौशी कलावंत व शाळांमधील चित्रकलेचे विद्यार्थी हे देखिल यामध्ये सहभाग नोंदवू शकतात त्यांनी सहभागाकरिता मुख्याधिकारी सचिन पवार, कला शिक्षक राजेंद्र दिवेकर, संजय गोळपकर, नितिन कल्याण, सचिन कुटे, संजोग पिसे, सागर तावरे, विशाल केदारी, नितिन तावरे, विशाल बोडके, धनंजय होनंर्गी, प्रमोद प्रांचाळ, हनुमंत वाघमारे, चंद्रकांत जोशी, दत्ता थोरात आदीशी संपर्क साधावा. नवोदित कलाकारांना यामधून आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून या रंगकामामुळे शहरात येणारे पर्यटक व नागरिक यांना देखिल स्वच्छतेचे महत्व समजणार आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून रस्त्याच्या कडेला ज्या ठिकांणी वारंवार कचरा टाकला जातो अशा भागातील भिंती देखिल रंगवत त्यावर प्रबोधनपर संदेश लिहिण्यात येणार आहेत.