...अन् स्वरराज ठाकरे झाले राज ठाकरे; राज यांनीच सांगितली दुसऱ्या बारशाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 11:23 AM2018-09-10T11:23:59+5:302018-09-10T11:27:39+5:30
दुसऱ्या बारशाची गोष्ट ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला
पुणे: माझं आधीचं नाव स्वरराज होतं. मात्र बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन मी राज या नावानं व्यंगचित्र काढू लागलो, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नावाची गंमत सांगितली. माझे वडील संगीतकार होते. त्यामुळे मुलगा संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, असं त्यांना वाटत होतं. मात्र मला वेगळेच 'राग' येऊ लागले, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वरराज करंडक स्पर्धेला राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी तरुणाशी संवाद साधला.
स्वरराज ठाकरे नंतर राज ठाकरे कसे झाले, याची आठवण मनसेच्या अध्यक्षांनी स्वरराज करंडक स्पर्धेत सांगितली. 'मी पाळण्यात असताना वडिलांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. वडील संगीतकार असल्यानं मुलगादेखील पुढे जाऊन संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, या विचारानं वडिलांनी माझं नामकरण केलं. मात्र नंतर मला वेगळेच राग येऊ लागले आणि त्या रागाचं परिवर्तन वेगळ्याच ठिकाणी झालं. मात्र अजूनही स्वरराज हेच नाव माझ्या पासपोर्टवर आहे,' असं राज ठाकरे यांनी सांगितली.
आपल्याला राज ठाकरे हे नाव बाळासाहेबांनी दिलं, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. 'मी सुरुवातीला स्वरराज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढायचो. व्यंगचित्रातील माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्याच नावानं झाली होती. मात्र सहा-आठ महिन्यांतच मला बाळासाहेबांनी नावात बदल करायला सांगितला. मी व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कारकीर्द बाळ ठाकरे नावानं सुरू केली. त्यामुळे तू राज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढ, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं आणि माझ्या नावाचं बारसं झालं,' अशी आठवण राज ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली.
माझ्या घरात सर्वांची नावं संगीतातल्या विविध रागांवरुनच ठेवण्यात आली आहेत, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 'माझ्या आईचं नाव मधुवंती आहे. तर बहिणीचं नाव जयजयवंती आहे. त्यामुळे माझं स्वरराज ठेवलं. मुलगा संगीतात कारकीर्द करेल, असं कुटुंबीयांनी वाटलं होतं. पण त्या रागाचं पुढे काहीच झालं नाही,' असं राज ठाकरे यांनी म्हटलं.