हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण बारामती बंद, नगरपालिकेसमोर निषेध सभा, विविध संघटनांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 02:11 AM2017-09-14T02:11:17+5:302017-09-14T02:11:47+5:30
बारामती : येथील माजी नगरसेवक अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहरात विविध संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या बारामती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांसह कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती शहरात अज्ञात तीन व्यक्तींनी चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात गव्हाळे हे जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल व घटनेच्या निषेधार्थ आज दि. १३ सप्टेंबर रोजी बारामती बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार बारामती शहरात सर्व व्यावसायिकांनी बंद पाळला. दुपारी चारनंतर बंद असलेली दुकाने उघडण्यात आली.
दरम्यान, बारामती शहरात सकाळी ११ वाजता विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणाहून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, रिपाइंचे पश्चिम महाराष्टÑाचे अध्यक्ष एम. बी. मिसाळ, मनसेचे राज्य सचिव अॅड. सुधीर पाटसकर, मनसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विनोद जावळे, मुनीर तांबोळी, सोमनाथ गजाकस, बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय लोंढे आदींनी अॅड. गव्हाळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी मखरे यांनी राज्य सरकारवर
टिकेची झोड उठवली. दरम्यान, या मोर्चाचे नियोजन चंद्रकांत खंडाळे, अरविंद बगाडे, रमेश साबळे, भोला जगताप, अॅड. विनोद जावळे, तानाजी पाथरकर, माऊली दुर्गे आदींसह इतरांनी केले होते.
तिघांना न्यायालयीन कोठडी
अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर केलेल्या हल्ला प्रकरणातील तिघांना मंगळवारी (दि १२) सायंकाळी बारामती शहर पोलिसांनी अटक केली. विकास ऊर्फ नानाजी धनाजी बाबर (वय २७, रा. पिंपळी, ता. बारामती), अभय दिलीप केमकर (वय २५, हल्ली रा पंचतालिम कैकाडगल्ली, बारामती, मूळ रा. मेडद, ता माळशिरस, जि. सोलापूर) व गणेश सुभाष जाधव (वय २४, हल्ली रा. देसाई इस्टेट, बारामती, मूळ रा. मिरजगाव, ता. कर्जत) अशी अटक करण्यात आले्ल्या संशयितांची नावे आहेत. आरोपीच्या बाजूने वकील नसल्याने न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून दि.२३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.