बारामती मोटरवाहन संघाच्या खात्यात गैरव्यवहार
By Admin | Published: July 6, 2017 02:56 AM2017-07-06T02:56:57+5:302017-07-06T02:56:57+5:30
येथील बारामती मोटार वाहन संघाच्या बॅँक खात्यातून २ कोटी ६३ लाख रुपये काढून गैरव्यवहार केल्याप्रकरणी बारामती नगरपालिकेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : येथील बारामती मोटार वाहन संघाच्या बॅँक खात्यातून २ कोटी ६३ लाख रुपये काढून गैरव्यवहार केल्याप्रकरणी बारामती नगरपालिकेचे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे गटनेते आणि बारामती सहकारी बॅँकेचे संचालक सचिन सातव यांच्या विरोधात बारामतीच्या प्रथम वर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. बारामती शहर पोलिसांनी कारवाई न केल्याने संघाचे खजिनदार प्रमोद पांडुरंग सातव यांनी न्यायालयात फिर्याद दिली आहे.
बारामती एमआयडीसीतील पियाजो कंपनीच्या रिक्षा वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांनी २००८ मध्ये बारामती मोटार वाहतूक संघाची स्थापना केली. धर्मादाय संस्था म्हणून नोंदणी केली. अध्यक्षपदी दीपक विरसिंग तावरे, उपाध्यक्ष सचिन सदाशिव सातव, सचिव सौरभ महावीर शहा, खजिनदार प्रमोद पांडुरंग सातव हे पदाधिकारी आहेत. तर रणजित पवार, सदाशिव सातव, प्रल्हाद लांडेपाटील हे सदस्य आहेत. स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या ट्रक चालकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करणे आदींसाठी जागा खरेदी करणे असे ठरले होते. त्यानुसार सर्व ट्रक मालक, सभासदांकडून जमा होणारी वर्गणी बारामती सहकारी बँकेत काढलेल्या चालू खात्यात भरले जात होते. त्या खात्यातून २ कोटी ६३ लाख रुपये सभासदांना विश्वासात न घेता उपाध्यक्ष सचिन सातव यांनी काढले. त्यातील ४० लाख रुपये त्यांचे स्वत:चे बारामती सहकारी बँकेत असलेल्या खाते क्रमांक १३९९६ मध्ये वर्ग केले. रणजित अशोक तावरे यांच्या खात्यात १० लाख रुपये जमा केले. उर्वरित रक्कम स्वत:साठी काढली. संस्थेची रक्कम काढताना प्रोप्रायटर म्हणून शिक्का व सही त्यांनीच केली आहे.
संघाचे अध्यक्ष विरसिंह तावरे, उपाध्यक्ष सचिन सातव आणि सचिव सौरभ गांधी यांनी संगनमताने केल्याचा आरोप संस्थेचे सभासद प्रशांतनाना सातव यांनी केला. त्याच पैशाच्या कारणावरून वाद झाल्याने सचिव सौरभ गांधी यांनी त्यामध्ये सचिन सातव, खजिनदार प्रमोद सातव, बँक अधिकारी श्रीकृष्ण जाधव यांच्या विरोधात न्यायालयात नोव्हेंबर २०१६ रोजी फिर्याद दाखल केली होती. मात्र, आर्थिक तडजोडीने दि. २३ जानेवारी २०१७ रोजी न्यायालयातील फिर्याद गांधी यांनी माघार घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार निदर्शनास आल्याने खजिनदार प्रमोद सातव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर बारामती शहर पोलिसांकडे देखील तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी राजकीय दबावाने गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे १ जुलै रोजी बारामतीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद देवून या गैरप्रकाराच्या विरोधात दाद मागितली आहे. त्यावर ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे, असे प्रशांत सातव यांनी सांगितले. या वेळी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, नगरसेवक विष्णूपंत चौधर, जहीर पठाण, शहाजी कदम आदी उपस्थित होते.
गैरव्यवहारातील १ कोटी ७३ लाखांचा भरणा...
हा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर २ कोटी ६३ लाखापैकी ४० लाख सचिन सातव यांनी त्यांच्या खात्यातून मोटर वाहन संघाच्या खात्यात जमा केले. तसेच १ कोटी ३३ लाख ५० हजार रोख रकमेचा भरणा केला. दोन्ही रकमा २४ जानेवारी २०१७ ला भरल्या आहेत. एकूण १ कोटी ७३ लाख ५१ हजार ८०० रुपये परत भरले आहेत. नोटाबंदीच्या काळात या रकमेचा भरणा झाला आहे. या व्यवहारात बारामती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांचे देखील चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यक्तिगत रागातून आरोप
करण्यात आलेले आरोप नगरपालिका निवडणुकीतील पराभवाच्या रागातून केले आहेत. तक्रारदार प्रमोद सातव हे बारामती मोटार वाहन संघाचे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे संस्थेचा सर्व निधी, हिशेब, जमा खर्च आहे. संघाच्या ट्रक टर्मिनलसाठी जागा खरेदी करण्यासाठी सर्वानुमते एमआयडीसीतील माझ्या मालकीची जागा घेण्याचे ठरले. संस्थेच्या खात्यातून इसारापोटी रक्कम देण्यात आली. पुढे व्यवहार न झाल्याने ती रक्कम संस्थेच्या खात्यात भरली. त्यामुळे गैरव्यवहार होण्याचा प्रश्नच नाही, असे नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांनी सांगितले.