तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 11:02 AM2017-08-20T11:02:53+5:302017-08-20T15:50:22+5:30
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला टोला हाणला आहे.
पुणे, दि. 20 - हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला टोला हाणला आहे. त्यांनी कर्जमाफीच्या धोरणावरही टीका केली. जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर ह्य त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेनह्ण असा उपरोधिक टोला मारला. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही.
पवार म्हणाले, मान्सून लांबला आहे. परिणामी राज्याच्या काही भागात दुबार पेरणीची वेळ असून, ते आर्थिकदृष्ट्या संकटच आहे. शेतकरी सध्या या संकटातून जात आहेत. मलाही या सगळ्या गोष्टींची गेल्या दोन-तीन दिवसांपर्यंत भयंकर काळजी होती, परंतु काल हवामान क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या चार दिवसात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागात चांगला पाऊस पडेल. ते खरे ठरावे एवढीच माझी अपेक्षा आहे.
तसेच, कर्जमाफीत शेतक-यांनी कर्जमाफ झाले आहे, असे पत्र बँकेत दिले आहे, असे मला कोठे दिसले नाही, अशीही टीका त्यांनी केली. युवा पिढी शेतीपासून दूर झाली तर देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल. आज युवापिढी शेती सोडून राजकारणात अधिक रस घ्यायला लागला आहे. युवकांना विचारल्यावर जिल्हा परिषद सदस्यापासून ते खासदारांपर्यंत स्वप्न रंगवले जातात. ही बाब आक्षेपार्ह नसली तरी अर्थकारणावर मोठे परिणाम करणारी आहे, असेही त्यांनी सांगितले.