चित्रीकरणाचा विद्यार्थ्यांना लाभ - नागराज मंजुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:29 IST2017-10-17T03:29:22+5:302017-10-17T03:29:46+5:30
फुटबॉल खेळावरील चित्रपटाच्या निर्मितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आले असून, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चित्रीकरण पाहता येणार आहे.

चित्रीकरणाचा विद्यार्थ्यांना लाभ - नागराज मंजुळे
पुणे : फुटबॉल खेळावरील चित्रपटाच्या निर्मितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आले असून, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चित्रीकरण पाहता येणार आहे. तसेच चित्रपट निर्मितीविषयीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. मात्र, त्याचा मोठा मुद्दा करण्यात आला, अशी खंत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.
पुणे विद्यापीठाच्या क्रीडांगणाचा काही भाग नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी देण्यात आला आहे. मात्र, त्यावर काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला. त्यावर नागराज मंजुळे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की मी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. मला चित्रीकरणासाठी मैदान लागणार असल्याने मी विद्यापीठाकडे विचारणा केली होती. विद्यापीठाशी करार झाल्यानंतर मैदान प्राप्त झाले. विद्यापीठाच्या आवारात चित्रीकरण होत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो. विद्यापीठातील कोणत्याही विभागाचा विद्यार्थी असो, तो चित्रपटाच्या एखाद्या गोष्टीसाठी योग्य वाटल्यास त्याला सामावून घेण्यात येईल.
मैदान पूर्ववत करण्यात येईल
विद्यापीठाच्या मैदानाचा १0 टक्के काही भाग आम्ही चित्रीकरणासाठी घेतला आहे. उर्वरित मैदान विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोकळे आहे. तसेच प्रवेश निषिद्धच्या पाट्या विद्यार्थ्यांसाठी नाहीत; तर आमच्या लोकांपैकी कोणी वाहने मैदानावर घेऊन जाऊ नयेत यासाठी लावण्यात आल्या आहेत. तसेच चित्रीकरणावेळी योग्य अंतरावरून विद्यार्थ्यांना चित्रपटाचे चित्रीकरण पाहता येईल.
चित्रपटासाठी सेट उभारताना जे काही खड्डे खणण्यात आले आहेत, ते पूर्ववत करण्यात येतील. विद्यापीठाचे मैदान पूर्वी होते तसेच आम्ही करून देणार आहोत, असे मंजुळे म्हणाले.