जनतेची भाऊबीज हा आयुष्यातील आनंदाचा अनमोल ठेवा; अग्निशामक दलासह अनोखी भाऊबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:50 PM2017-10-21T15:50:12+5:302017-10-21T16:03:20+5:30
कै. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अग्निशामक दलाच्या जवानांना ओवाळून त्यांच्यासाठी भाऊबीजेचा सण अविस्मरणीय करण्यात आला.
पुणे : एकीकडे सर्व जनता दिवाळीचा आनंद लुटत असताना अग्निशामक दलाचे जवान मात्र आपले कर्तव्य बजावत असतात. इतरांची दिवाळी सुखकर आणि उत्साहात जावी याकरिता त्यांना कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करण्यापासून वंचित राहावे लागते. स्वत:च्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी करता येत नाही. ही भावना लक्षात घेऊन भोई प्रतिष्ठानच्या वतीने साजरी झालेल्या भाऊबीजेने जवान भारावून गेले...सर्वांचेच डोळे नकळतपणे पाणावले. ही ‘भाऊबीज’ प्रत्येक अग्निशामक दलाच्या आयुष्यातील आनंदाचा अनमोल ठेवा आहे, असे भावोद्गार पुणे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी काढले.
कै. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अग्निशामक दलाच्या जवानांना ओवाळून त्यांच्यासाठी भाऊबीजेचा सण अविस्मरणीय करण्यात आला. याप्रसंगी पालकंत्री गिरीश बापट, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. विठ्ठल जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक (गुप्त वार्ता विभाग) चंद्रशेखर दैठणकर, पोलीस उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ, महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, उल्हास पवार, अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री जयमाला इनामदार, मुस्लिम विचारवंत अनिस चिश्ती, मुश्ताक पटेल, इकबाल दरबार, तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष प्द्मा गाबरेल, अॅड. प्रताप परदेशी, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, गुरूजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, उद्योजक दादा गुजर, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.
स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणारे अग्निशामक दलाचे फायरमन राजीव टिळेकर व बाबू शितकाल यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
अग्निशामक दलाच्या कर्तव्यपर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणेकरांच्या वतीने गेली वीस वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.
मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे मुश्ताक पटेल, युसुफभाई चावीवाले व माजी नगरेसवक रशीद शेख यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिरखुर्माचा आस्वाद जवानांनी घेतला.