दिवाळी सण मोठा ! नाही आनंदा तोटा
By admin | Published: October 21, 2014 05:20 AM2014-10-21T05:20:30+5:302014-10-21T05:20:30+5:30
भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठ्या दिवाळी सणास सुरुवात होत असतानाच बाजारपेठा विविधतेने नटल्या आहेत.
पिंपरी : भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठ्या दिवाळी सणास सुरुवात होत असतानाच बाजारपेठा विविधतेने नटल्या आहेत. फराळ, कपडे, फटाके, फुले, चोपड्या, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आकाशकंदील आदी दिवाळीचे महत्त्व व प्रसन्नता वाढवणाऱ्या सगळ्याच गोष्टी बाजारात दिसत आहेत. त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने पिंपरी कॅम्प परिसर व शहरातील इतर ठिकाणच्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
दिवाळीत कपड्यांना वेगळेच महत्त्व असते. लहान-थोर सर्वच नवे कोरे कपडे परिधान करून नटण्याचा प्रयत्न करतो. दिवाळीच्या आनंदामध्ये नव्या-कोऱ्या कपड्यांची भर पडते. दर वर्षी कपड्यांचे अनेक नवे ट्रेण्ड बाजारात येत असतात. आता रेडिमेड कपड्यांना जास्त मागणी असते. मुले आणि महिलांच्या वस्त्रप्रावरणात अनेक नवे ट्रेण्ड आले आहेत. दुकानामध्ये कपड्यांची आकर्षक पद्धतीने केलेली सजावट मनाला भुरळ घालणारी असते. या वर्षी कपड्यांच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही गर्दी वाढतीच आहे. आकर्षित करणारे पोषाख दाखल झाले आहेत. या वर्षी मोदी कुर्ता, जॅकेट, फुल कुर्ता विशेष आकर्षण आहे.
टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्रींनी घातलेल्या विविधरंगी आणि डिझायनर साड्यांना महिलांची पसंती आहे.
नवीन फॅशननुसार शॉर्ट शर्टला सर्वाधिक मागणी असल्याचे त्यात नवनवीन प्रिंटेड, प्लेन, डिझायनिंग शर्ट, पंजाबी सूट आणि लहान मुलांसाठी रेडिमेड ड्रेस आले आहेत. साड्यांच्या किमती ३०० पासून १५ ते ३० हजारांपर्यंत आहेत. पंजाबी ड्रेस आणि अनारकली ड्रेसच्या किमती १ ते ७ हजारांपर्यंत आहे. पुरुषांच्या जीन्स आणि शर्ट-पॅण्टच्या किमती ४०० ते २० हजार रुपयांपर्यंत आहे. फटाक्यांमध्ये फॅन्सी फटाके आणि विविध प्रकारचे झाड खरेदीचा उत्साह बच्चे कंपनीत दिसून येत आहे. लहान स्टॉलधारकही मोठ्या प्रमाणात आहेत. (प्रतिनिधी)