अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 02:00 PM2024-05-09T14:00:53+5:302024-05-09T14:05:03+5:30

अजित पवारांनी जाहीरपणे टीका केल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी संयमी भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

BJP Chandrakant Patil is silent on NCP leader Ajit Pawars criticism | अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?

अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?

Chandrakant Patil ( Marathi News ) : महाराष्ट्रात यंदा बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचंड गाजली. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या रुपाने कुटुंबातूनच आव्हान मिळालं. बारामती मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी या निवडणुकीवरून सुरू झालेला कलगीतुरा अजूनही थांबायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. आम्हाला बारामतीत शरद पवार यांचा पराभव करायचाय, असं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याचा आज अजित पवार यांनी जोरदार समाचार घेत ती एक चूक होती, असं मान्य केलं. मात्र अजित पवारांनीही जाहीरपणे टीका केल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी संयमी भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

चंद्रकांत पाटील हे आज भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी पाटील यांना अजित पवारांच्या विधानाविषयी प्रतिक्रिया विचारली. मात्र पत्रकारांच्या प्रश्नावर पाटील यांनी मौन धारण करणंच पसंत केलं.

दरम्यान, विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर आक्रमक पलटवार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आज अजित पवारांबाबत मात्र संयमी भूमिका घेतली.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी म्हटलं की, "पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं होतं. त्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. शरद पवार बारामतीमध्ये निवडणुकीमध्ये उभे नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही, पवार साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती.  त्यांनी ते बोलायला नको होतं, ते का बोलून गेले आम्हालाही माहिती नाही. त्यानंतर मी चंद्रकांतदादांना म्हणालो की, तुम्ही पुण्यातच काम बघा. मी आणि आमचे कार्यकर्ते बारामतीचं काम बघतो. त्यांनी पाटील यांनी अवाक्षर देखील काढलं नाही. या निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते, त्यामुळे त्यांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीत उभ्या होत्या. त्यामुळे त्यांच्या दोघींतील एकीचा पराभव होईल," असंही अजित पवार म्हणाले. 

Web Title: BJP Chandrakant Patil is silent on NCP leader Ajit Pawars criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.