भाजपाला यशवंत कारखाना चालूच करायचा नाही; शिवाजीराव आढळराव यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:13 PM2017-11-30T13:13:10+5:302017-11-30T13:19:27+5:30
यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना कारखाना चालूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.
मांजरी : यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना कारखाना चालूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.
हडपसर मांजरी येथील विकास कामांची पाहणी करण्यासाठी ते आले होते, त्यावेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक तानाजी लोणकर, विजय देशमुख, शहर उपप्रमुख समीर तुपे, दिलीप कवडे, अमित घुले, शंकर घुले, सूरज घुले आदी उपस्थित होते.
आढळराव पुढे म्हणाले, की कारखाना चालू करण्यासाठी आम्ही आग्रही होतो, परंतु भाजपा सरकारने आम्हाला विश्वासात न घेता पसस्पर कारखान्याचे प्रशासकीय मंडळ स्थापन केले. त्या प्रशासकीय मंडळात शिवसेनेच्या प्रतिनिधींपैकी एकाही व्यक्तीला संचालक म्हणून घेतले नाही. संपूर्ण संचालक मंडळात भाजपाचेच लोक घेतले आहे. त्यातील काहींना कारखान्यातील माहिती देखील नाही. त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे, अशी टीका खासदार आढळराव यांनी केली.
मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे सुमारे ५० कोटी रूपयांचे काम जीएसटीमुळे लांबणीवर पडले होते. तो प्रश्न मिटल्याने आता येत्या दोन महिन्याच्या आत हे काम सुरू होईल. महादेवनगर-मांजरी रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम वेगोने सुरू आहे. गेल्या दोन वर्षापासून त्या कामाचा आपण पाठपुरावा केला आहे. पुनावाला ग्रुपच्या कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीमधून हे काम साकारत आहे. मतदार संघातील इतर मोठ्या गावातील कचरा व इतर कामांच्या बाबतही पुनावाला ग्रुपशी आपली चर्चा सुरू आहे. गेल्या दोन महिन्यात तीन-चार वेळा पालिका आयुक्तांशी चर्चा करून हडपसर मतदार संघातील कचरा, पाणी, पालखी रस्ता, पुलांची बांधणी, वाहतूक आदी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे ही कामेही पुढील काळात मार्गी लागणार आहे.
दरम्यान, आढळराव यांनी मांजरी रस्त्याच्या कामाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. पुणे-सोलापूर महामार्गावर वाहत असलेले ड्रेनेज, महामार्गाच्या पट्ट्यात आवश्यक असलेले पार्किंग आदी प्रश्न नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी लागलीच महामार्ग अभियंत्यांना फोन लावून हे प्रश्न सोडविण्यास सांगितले.